थंडीतल्या भूकेवारचा उतारा

भरपूर खाण्याचा आणि पचवण्याचा ऋतू म्हणजे हिवाळा. या दिवसात तेलकट, मसालेदार पदार्थ अगदी सहज पचतात. थंडीत भूकही जास्त लागते. काहींना सतत खावंसं वाटतं. वारंवार भूक लागते. भूक लागली की काहीतरी तोंडात टाकलं जातं. तुपकट, तेलकट पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम आपल्या तब्बेतीवर होतो. वजन वाढू लागतं. म्हणूनच आपण थंडीतल्या भूकेवर नियंत्रण ठेवायला हवं. थंडीत जास्त भूक लागण्याची कारणं, त्यावर कसं नियंत्रण ठेवायचं याबाबत सविस्तर माहिती घेऊ. थंडीत बाहेरच्या तापमानात घट होत असली तरी शरीराला आपलं सामान्य तापमान टिकवून ठेवायचं असतं. हे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीराला ऊर्जा हवी असते आणि ही ऊर्जा अन्नातून मिळत असते. शरीराला तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळवून देण्यासाठी चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि अन्नपचन जलद गतीने होतं. यामुळे जास्त भूक लागते. पण भूक लागली की सतत खात बसल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढतं. थंडीत भूक लागली तरी आरोग्यदायी पदार्थ खायला हवेत.

फायबर म्हणजे तंतूमय पदार्थांनी युक्त अन्न खाल्ल्यामुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं. तंतूमय पदार्थांमुळे पचनक्रिया सुलभ पद्धतीने सुरू राहते. म्हणून या दिवसात नाचणी, ज्वारी, बाजरी, मका, ओट्स ,दलिया यांचं सेवन करायला हवं. हंगामी फळं आणि भाज्यांचं सेवन वाढवायला हवं. थंडीत गाजर, संत्री, पालक, मेथी, मुळा, कांदापात, बीट यांचा समावेश आहारात करायला हवा. थंडीत स्ट्रॉबेरीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. क जीवनसत्त्वाने युक्त स्ट्रॉबेरी खायला हवी. कमी कॅलरीयुक्त फळं आणि भाज्या खाल्ल्याने तुमचं वजन नियंत्रणात राहू शकतं. थंडीत गरम पाणी प्यायला हवं. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहू शकतं. तसंच यामुळे सदी-खोकल्यातही आराम मिळू शकतो. रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया उत्तम सुरू राहते.

थंडीत द्रवपदार्थांचं सेवन वाढवायला हवं. या दिवसात फळांचे रस, आरोग्यदायी सूप, डाळ यांचं सेवन करता येईल. सतत खाण्याची इच्छा मारण्यासाठी काही काळ इतर गोष्टींमध्ये मन रमवा. साधारण 20 मिनिटांनी खाण्याची इच्छा मरते. त्यामुळे खावंसं वाटू लागलं की थोडं चाला, बागकाम करा, फोनवर बोला. घरातली कामं करा. यामुळे तुम्हालाही ताजंतवानं वाटेल. नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेतल्याने भूकेस कारणीभूत ठरणारे घ्रेलिन नामक हार्मोन्सची पातळी कमी होते आणि तुम्हाला कमी भूक लागते. अपुर्‍या झोपेमुळे सतत काहीतरी खावंसं वाटतं. त्यामुळे सात ते आठ तासांची झोप नक्की घ्या. आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवल्यानेही भूक कमी लागते. फार वेळ उपाशी राहू नका. खूप भूक लागली की जास्त खाल्लं जातं. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खा. एकाच वेळी भरपूर जेवू नका. अन्नाची विभागणी करा. अशा पद्धतीने थंडीत वाढणारी अन्नाची आसक्ती कमी करता येईल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा