जेऊर परिसरात दिसले आणखी दोन बिबटे, वनविभागाने दिले तरस असल्याचे स्पष्टीकरण

अहमदनगर – अहमदनगर तालुक्यातील जेऊर येथे दोन बिबटे पाहिल्याची जोरदार चर्चा सुरू असून वनविभागाच्या वतीने मात्र ते तरस असल्याचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरातील जरे वस्ती येथे चार दिवसांपूर्वी अपघातात एका 7 वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाला होता. या बिबट्या सोबत दोन बछडे असल्याचे अनेक नागरिक सांगत आहेत. जरे वस्ती परिसरात राम शंकर तोडमल यांनी घराशेजारी असणार्‍या उसाच्या शेताजवळ दोन बिबट्यांचे बछडे पाहिले असल्याचे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सांगितले. त्यानंतर माजी उपसरपंच बंडू पवार यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली.

जेऊर परिसरात बिबटे पाहिल्याचा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे ग्रामस्थांना देण्यात आला. त्यानंतर वनविभागाच्या वतीने वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक मनेष जाधव, वनकर्मचारी तुकाराम तवले, संजय सरोदे, मुकेश साळवे, बाळकृष्ण पालवे यांनी घटनास्थळी भेट देवून ठसे तपासणी केली. त्यावेळी ठसे बिबट्यांचे नसुन तरसाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. जेऊर परिसरात बिबट्याचे दोन बछडे फिरत असल्याचे अनेक जणांनी पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. यापुर्वीही या परिसरात बिबट्याचे वास्तव्य आढळून आलेले आहे त्यामुळे नागरिकांनी दक्षता पाळण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने वनपाल शैलेश बडदे व वनरक्षक मनेष जाधव यांनी केले आहे. यावेळी वनविभागाच्या वतीने परिसरात जनजागृती करण्यात आली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा