अहमदनगरमधील उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडची झालीय प्रचंड दुरावस्था

खाच खळगे, खड्डे आणि धुळीचे साम्राज्य; नागरिकांना करावा लागतोय जीव धोक्यात घालून प्रवास

(छाया-बबलू शेख,अहमदनगर)  

अहमदनगर- अहमदनगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम सध्या सुरु आहे. मात्र हे काम सुरु करण्यापूर्वी सर्व्हिस रोडच्या मजबुतीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या काही दिवसांपासून या सर्व्हिस रोडची प्रचंड दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खाच खळगे, मोठमोठे खड्डे आणि सर्वत्र मातीचे ढिगारे यामुळे उडणारी धुळीने नागरिकांचा जीव गुदमरत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार संस्थेच्या नियोजन शून्य कारभाराचा प्रचंड त्रास नगर शहरातील नागरिकांसह जिल्हाभरातून शहरात येणार्‍या नागरिकांना, वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. तसेच अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. उड्डाणपुलाचे काम गेली 10 वर्षे रखडले होते. या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्यानंतर केंद्र शासनाच्या निधीतून या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागले. सध्या ते वेगात सुरु आहे, हे काम महत्वाचे आहेच परंतु ते करत असताना नगर शहर हे मध्यवर्ती शहर असल्याने आणि या शहरातून 7 राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने येथून मोठ्या प्रमाणावर लांब पल्ल्याची वाहतूक अहोरात्र सुरु असते, याचा विचार करून या वाहतुकीची व्यवस्था करणेही तितकेच महत्वाचे आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार संस्थेला याचे काहीही घेणेदेणे दिसून येत नाही. त्यांचे लक्ष केवळ उड्डाणपुलाच्या कामावरच आहे. त्यामुळेच या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडची प्रचंड दुरवस्था होऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार संस्थेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.परिणामी वाहनचालकांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना आणि ठेकेदार संस्थेला आणखी किती बळी हवेत? – उड्डाणपुलाचे काम सुरु झाल्यापासून या सर्व्हिस रोडवर अनेक छोटे मोठे अपघात सातत्याने होत आहेत. या अपघातांत आत्तापर्यंत 5 ते 6 जणांचा बळी गेल्याची नोंद पोलिस दप्तरी झालेली आहे. साधा खडी व मुरूम टाकूनही खड्डे बुजविण्याची तसदी अद्याप घेतली गेलेली नाही.त्यामुळे दिवसेंदिवस खड्ड्यांमध्ये वाढ होत आहे. सर्व्हिस रोडच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करणार्‍या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना आणि ठेकेदार संस्थेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना अजून किती निष्पाप नागरिकांचे बळी घेवून त्यांची कुटुंबे उध्वस्त करायची आहेत, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे रहिवासी भागातून होतेय वाहतूक – सध्या बहुप्रतीक्षित असा शहरातील प्रमुख रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम चालू आहे आणि त्याच बरोबर उड्डाणपुलाचे काम जेथून सुरु आहे त्या पासून ते जिथे संपत आहे त्या संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. या रस्त्यावर धुळीचे, खड्यांचे साम्राज्य झालेलं पहायला डोळे देखील उघडू शकत नाही. कारण या धुळीमुळे लोकांना डोळ्यांच्या आजाराला सामोरं जावं लागत आहे. सोबतच श्वसनाचे त्रास सुद्धा सुरु झाले. खरंतर लोक कोरोनाच्या भीतीने नाही तर या धुळीपासून संरक्षण व्हावं म्हणून मास्क लावून शहरभर वावरत आहेत. या सर्व त्रासातून आयुष्य जगत असताना सर्वसामान्यांना आता अजून एका जीवघेण्या गोष्टीला सामोरं जावं लागत आहे ते म्हणजे या उड्डाणपुलाच्या लगत असलेला जो काही रहिवाशी भाग आहे या भागातून अवजड वाहने दिवस रात्र चालू आहे याने परिसरातील लोकांचा वावर कमी झाला लहान मुलांचे खेळणे बंद झाले, लोकांना मुठीत जिव घेऊन वावर करावा लागत आहे. त्या सोबतच या अंतर्गत रस्त्यांची या अवजड वाहतूकी मुळे दुरवस्था होतं आहे.

…तर उड्डाणपुलाचे काम थांबवा – सुमित वर्मा

उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातील रहिवासी भागातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुरु असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होण्याबरोबरच महापालिकेच्या रस्त्यांचीही दुर्दशा होत आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. ही रहिवासी भागातून होणारी वाहतूक तातडीने थांबवावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे इंपिरियल चौक, चाणक्य चौक, माणिकनगर भागातून अवजड वाहने रहिवासी अंतर्गत भागातून मोठ्या प्रमाणात ये-जा करत आहेत. हे आता खपवून घेतले जाणार नाही. जर प्रशासनाकडे या गोष्टीला पर्याय नसेल तर उड्डाणपुलाचे काम थांबवा, जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही, नाहीतर आम्हाला या भागात बॅरिकेड्स लाऊन नागरिकांची सोय करून द्या. कृपया लोकांच्या जीवाशी खेळणं थांबवा आणि तात्काळ या भागातील या प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती वर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांनाही दिल्या आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा