साणासुदीने झळाळणार अर्थव्यवस्था

केवळ ग्राहकच नव्हे तर व्यावसायिकसुद्धा संपूर्ण वर्षभर दसरा-दिवाळी या सणासुदीच्या हंगामाची मोठ्या उत्कंठेने प्रतीक्षा करीत असतात. कारण या कालावधीतच व्यावसायिकांची इतकी कमाई होते की नंतर वर्षभर त्यांची व्यवसायाची गाडी सुरळीत चालते. असेच समाधान ग्राहकांच्याही पदरात पडत असते, कारण याच कालावधीत एकाहून एक आकर्षक अशा विविध योजनांचा लाभ त्यांना घेता येतो. कोरोनातील पीछेहाटीनंतर या हंगामाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत.

कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही? दुसरी लाट संपली की अद्याप सुरू आहे? यावर लोकांची वेगवेगळी मते आहेत. परंतु हळूहळू व्यावसायिक आणि आर्थिक घडामोडी सुरू झाल्या असल्यामुळे सणासुदीच्या कालावधीकडून बाजारपेठेला मोठ्या अपेक्षा आहेत. गणेश विसर्जनानंतर दसरा-दिवाळी या प्रमुख सणांची प्रतीक्षा सुरू होते. म्हणजेच, शारदीय नवरात्रापासून दिवाळीपर्यंतचा कालावधी हा भारताच्या बाजारपेठेसाठी सर्वांत चांगला कालावधी असतो. या सणासुदीच्या दिवसांना भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे महत्त्व आहे. लोकांच्या संपूर्ण वर्षभरातील क्रयशक्तीच्या (पर्चेसिंग पॉवर) सुमारे 35 ते 40 टक्के खर्च या सुमारे एक महिन्याच्या कालावधीत होतो, यावरूनच या दिवसांचे महत्त्व लक्षात येते. केवळ ग्राहकच नव्हे तर व्यावसायिकसुद्धा संपूर्ण वर्षभर या सणासुदीच्या हंगामाची मोठ्या उत्कंठेने प्रतीक्षा करीत असतात. कारण या कालावधीतच व्यावसायिकांची इतकी कमाई होते की नंतर वर्षभर त्यांची व्यवसायाची गाडी सुरळीत चालते. असेच समाधान ग्राहकांच्याही पदरात पडत असते, कारण याच कालावधीत एकाहून एक आकर्षक अशा विविध योजनांचा लाभ त्यांना घेता येतो. यात झीरो इंटरेस्टपासून फ्रि गिफ्ट, व्हाउचर, कॅशबॅक, मोठी सूट अशा आकर्षक ऑफर्सचा समावेश असतो. याखेरीज सणासुदीच्या काळात बाजारपेठेत प्रत्येक वस्तूमध्ये मोठी व्हरायटी पाहायला मिळते. काही कंपन्या तर खास सणासुदीतच आपली नवीन उत्पादने बाजारात आणतात, जेणेकरून या काळात ग्राहकांच्या वाढणार्‍या क्रयशक्तीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त विक्री करता यावी. सारांश, सणासुदीच्या हंगामात ग्राहक आणि व्यावसायिक या दोहोंच्या अपेक्षा वाढलेल्या असतात.

अर्थात, कोरोनाच्या महामारीने केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला झटका दिला आहे. परंतु, रोजगाराचे जेवढे नुकसान या महामारीमुळे भारतात झाले, तेवढे क्वचितच अन्य देशांत झाले असेल. भारतात कोरोनाच्या साथीने कोट्यवधी लोकांना बेरोजगार केले. आता परिस्थिती काही प्रमाणात सुधारत आहे हे खरे असले तरी मार्च 2020 च्या पूर्वीसारखी परिस्थिती अद्याप झालेली नाही. अजूनही मोठ्या संख्येने लोक बेरोजगार आहेत. कदाचित त्यामुळेच अर्थतज्ज्ञांपासून व्यावसायिकांच्या आणि सरकारच्याही नजरा दिवाळीच्या 25 ते 30 दिवस आधीपासून सुरू होणार्‍या आणि दिवाळीनंतरही सुमारे 10 दिवस सुरूच राहणार्‍या या सणासुदीच्या हंगामावर खिळल्या आहेत. कारण जर सणासुदीचा हा हंगाम चांगला गेला नाही, तर अर्थव्यवस्था रुळावर आणणे सोपे नसेल. अशा स्थितीत सध्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत, त्याचे कारण म्हणजे बाजारपेठ रुळावर येण्याचे संकेत देत आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारातही बर्‍याच प्रमाणात सुधारणा झाली आहे. शेअर बाजाराने गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे 200 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक भांडवलाची निर्मिती केली आहे. सोन्याने ऐतिहासिक झळाळी पाहिल्यानंतर आता सोन्याचा भाव 43 हजार प्रति दहा ग्रॅमवर उतरला आहे. एक अब्ज डॉलरपेक्षाही अधिक आकार असलेली लग्नसराई बाजारपेठ म्हणजे वेडिंग इकॉनॉमी आपल्या पूर्वस्थितीत येण्यासाठी बेचैन झाली आहे आणि लोकांचे उत्पन्न घटल्यानंतरही पर्यटन उद्योगानेही गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या 200 टक्के अधिक उसळी घेतली आहे. म्हणजेच, बाजारपेठेत खूपच सकारात्मक वातावरण आहे आणि प्रत्येकाच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर रोकड उपलब्ध आहे.

सर्वांत महत्त्वाची बाब अशी की, गेल्या चार महिन्यांत जीएसटीचे संकलन दरमहा एक लाख कोटींच्या वर झाले आहे. देशातील सुमारे सात कोटी व्यापार्‍यांबरोबर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जोडल्या गेलेल्या शहरांची आणि गावांची एकूण लोकसंख्या सुमारे 40 कोटी आहे. या सर्वांनाच अशी अपेक्षा आहे की, यंदाच्या सणासुदीला भारतीय अर्थव्यवस्थेचे दिवस पालटतील. रिअल इस्टेट आणि वाहन उद्योग ही अत्यंत महत्त्वाची क्षेत्रे असून, याही क्षेत्रांना तेजीची आशा आहे. एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी सध्याची परिस्थिती अनुकूल आहे. अशा स्थितीत सरकारपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच सणासुदीच्या काळात असणार्‍या अपेक्षा वाढल्या आहेत आणि ते स्वाभाविकच आहे. बाजारपेठेला सणासुदीच्या काळाचे महत्त्व अधिक वाटण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. नेहमीच तसे होत असते. देशात जेवढ्या ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री दरवर्षी होते, त्यातील 45 ते 50 टक्के वस्तूंची विक्री पितृ पंधरवड्यानंतर येणार्‍या नवरात्री आणि दिवाळीनंतर एक आठवडाभर चालणार्‍या सणासुदीच्या हंगामात होत असते. कदाचित या सणासुदीची ताकद सरकारी आणि खासगी क्षेत्रातील लोकांना मिळणारा बोनस आणि अन्य आर्थिक लाभ हीच असावी. अप्रत्यक्ष रूपात हे पैसे अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठीच एकप्रकारे बाजारपेठेत गुंतविले जातात. म्हणूनच दीपावलीच्या आसपासचा कालावधी भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. या सणासुदीच्या कालावधीत रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर खरेदीचे व्यवहार होतात. दरवर्षी जेवढी घरे विकली जातात, त्यातील 54 टक्के घरे या कालावधीत विकली जातात. या उत्सवी वातावरणात सुमारे 48 कोटी भारतीयांकडे वर्षाच्या अन्य काळाच्या तुलनेत अधिक क्रयशक्ती असते. कारण त्यांना बोनस आणि अन्य लाभ मिळतात. अर्थात रिअल इस्टेट किंवा जागा, जमिनी, घरांच्या खरेदी- विक्रीचे विश्‍व बोनसच्या पैशांवर अवलंबून नसते; पण तरीही दसरा- दिवाळीच्या मुहूर्तावरच घरखरेदी अधिक केली जाते. यावर्षीही नवरात्री आणि दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर रहिवासी आणि व्यावसायिक जागांच्या मागणीत वाढ होत असल्याचे या क्षेत्रातील सूत्रांकडून समजते. यावर्षी एक आणखीही विलक्षण घटना घडली आहे. ती अशी की, दरवर्षी दसरा-दिवाळीच्या हंगामात सर्वाधिक विक्री होणारे क्षेत्र म्हणून वाहन उद्योगाचा लौकिक असताना, यावर्षी मात्र रिअल इस्टेट क्षेत्रात वाहन उद्योगापेक्षा अधिक उलाढाल होण्याची चिन्हे दिसत आहेत आणि त्याला सुरुवातही झाली आहे. याचे एक कारण सेमी कंडक्टरच्या तुटवड्यात लपले आहे. कोरोना कालावधीच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या या तुटवड्यामुळे मागणीनुसार वाहनांचे उत्पादन होऊ शकत नाही. त्यामुळे लोक जमिनी, घरे, फ्लॅट आदींमध्ये पैसा गुंतवत आहेत. अशी परिस्थिती असल्याने रिअल इस्टेट क्षेत्राचा ङ्गायदा होणार आहे. विशेषतः महानगरांलगत असलेल्या शहरांमध्ये घरांना मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. उदाहरणार्थ, दिल्लीच्या जवळ गुरुग्राम, नोएडा येथील घरांना अधिक मागणी दिसून येत आहे. भाड्याच्या घरात राहणारे अनेक लोक आता स्वतःच्या घरात राहायला जाण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. घरखरेदीसंबंधी विचारणा करणारे ङ्गोन आणि भेटी रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिकांच्या कार्यालयात या काळात नेहमीच वाढतात. यावर्षी सणासुदीच्या काळात यात उल्लेखनीय वाढ झाली आहे. दिल्ली एनसीआर भागात 2021 मध्ये 50 टक्क्यांहून अधिक वृद्धी पाहायला मिळाली असून, सणासुदीच्या तिमाहीत रिअल इस्टेटच्या बाजारात व्यावसायिक आणि रहिवासी अशा एकंदर 16 हजार नवीन वास्तूंची विक्री होईल, असे दिल्लीतील व्यावसायिक सांगतात. कमीअधिक ङ्गरकाने अशीच स्थिती देशाच्या काही प्रमुख शहरांत आहे. त्यामुळे सर्वच आघाड्यांवर यंदाचा सणासुदीचा हंगाम सुवार्ता घेऊन येईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा