‘नगर अर्बन’च्या निवडणुकीसाठी बँकेचेच कर्मचारी जुंपवल्याने ‘वसुली’ ठप्प अन् डीडीआरचे ‘काम’ चालू

अहमदनगर- नगर अर्बन को. ऑप बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची धामधूम सध्या सुरू झाली आहे. या निवडणूक प्रक्रियेत बँकेच्या कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये, असे सक्त आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी बजावले आहेत तथापी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात याच निवडणुकीच्या निमित्ताने बँकेच्या अनेक कर्मचार्‍यांना राबवून घेतले जात असल्याने बँकेचे कामकाज ठप्प अन् डीडीआरचे काम चालू अशीच अवस्था पहायला मिळत असून याबाबत बँकेच्या कर्मचार्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीची आचारसंहीता लागू करण्याबरोबरच निवडणूक अधिकारी आहेर यांनी बँक कर्मचार्‍यांसाठीही नियम लागू केले आहेत. ज्या शाखा कार्यालयात नेमणूक आहे त्याच कार्यालयात कर्मचार्‍याने वास्तव्य करणे आवश्यक असून मुख्य कार्यालयाच्या परवानगीशिवाय कार्यालय सोडू नये. कामकाजाच्या वेळेचे पालन करण्याबरोबरच व्यवस्थापकीय अधिकारी अथवा शाखाधिकारी बँकेत हजर असेपर्यंत कर्मचार्‍यांनी कार्यालय सोडता कामा नये. पुर्वपरवानगी शिवाय कोणीही रजेवर जाऊ नये. कोणतीही रजा या काळात उपभोगता येणार नाही. निवडणुक प्रक्रियेत कोणीही सहभागी होऊ नये, असे आदेश कर्मचार्‍यांसाठी बजावण्यात आले आहेत.

असे असले तरी निवडणुक अधिकारी यांनी मात्र स्वत: बँकेच्या स्टाफचा वापर सुरू केला आहे. काही अधिकार्‍यांसह कर्मचारी डीडीआर कार्यालयात निवडणुक कामासाठी घेण्यात आले आहेत. त्याचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होत आहे. वसुलीचे काम ठप्प झाले असून अनेक अधिकारी स्वत: ऐवजी त्यांच्या कनिष्ठ कर्मचार्‍यांना वसुलीसाठी पाठवत आहेत. अनेक प्रकरणे अधिकार्‍यांच्या सह्यांअभावी प्रलंबित आहेत. काही अधिकारी दोन दिवस वसुलीसाठी जातात अन् तीन दिवस गायब होतात त्यामुळे प्रलंबित फायलींवर सह्या होत नाहीत. सह्या करण्यास थेट नकार देण्याचे प्रकार घडत असल्याने ग्राहकांना हेलपाटे मारत रहावे लागते. वसुली, ठेवी, प्रलंबित प्रकरणे याकडे कोणाचेच लक्ष नसून त्यातच आता निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी काही कर्मचारी जुंपवल्याने सावळा गोंधळ निर्माण झाल्याचे काही कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. निवडणूक खर्च बँकेच्याच माथी पडणार असल्याने निवडणूक अधिकार्‍यांनी बँकेच्या ऐवजी स्वत:च्या कार्यालयाचे कर्मचारी या प्रक्रियेत नेमावेत आणि बँक कर्मचार्‍यांना त्यांच्या कामासाठी मुक्त करावे अशी भूमिका एका वरिष्ठ कर्मचार्‍याने मांडली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा