शहर व उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

अनुचित घटना घडण्यापूर्वी मनपाने बंदोबस्त करावा

(छाया-बबलू शेख,अहमदनगर)  

अहमदनगर- शहर आणि उपनगरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, अबालवृद्धांसह नागरिकांमध्ये या कुत्र्यांमुळे दहशत निर्माण झाली. शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यासमोर तर या कुत्र्यांनी नुसता उच्छाद मांडला आहे. कुत्र्यांचे एक मोठे टोळके माणिक चौक, आशा टॉकीज, तख्ती दरवाजा परिसरात भटकत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहर आणि परिसरातील भटके कुत्रे पकडण्यासाठी मोहिम महापालिकेच्या वतीने अनेकदा राबविण्यात आली. शहरात भटकत असलेल्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात येते. तथापि सदरची मोहिम केवळ काही दिवसांसाठीच राबविली जात असल्याने मोकाट भटक्या कुत्र्यांचा प्रश्न वारंवार उभा राहत आहे.

एक-दोन नव्हे तर 8 ते 10 कुत्र्यांची अनेक टोळकी शहराच्या विविध भागात भटकत राहतात. लहान मुले, वृद्ध, महिला यांना एकटे पाहून हे कुत्रे त्यांच्यावर हल्ला करतात. कुत्र्याच्या हल्ल्यात बालके जखमी होण्याच्या अनेक घटना आतापर्यंत शहरात घडल्या आहेत. एखादी घटना घडली की महापालिकेला तेवढ्यापुरती जाग येते. त्यानंतर भटकी कुत्री पकडण्याची मोहिम राबविली जाते. सध्या शहराच्या अनेक भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. दिवसा आणि रात्रीही कुत्र्यांची अनेक टोळकी रस्त्यावर फिरताना दिसते. दुचाकी वाहनांना अचानक कुत्रे आडवे येऊन अपघाताच्याही घटना घडत आहेत. रस्त्यावरून पायी जाताना अथवा वाहनांवरून जाणार्‍या नागरिकांचा कुत्रे पाठलाग करतात. त्यामुळे घाबरगुंडी होऊन अपघात घडतात. कोतवाली पोलिस ठाण्यासमोर तर या कुत्र्यांनी एक प्रकारे दहशतच निर्माण केली आहे. रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर फिरत असून, येणार्‍याजाणार्‍या नागरिकांवर अचानक भुंकतात. त्यामुळे या परिसरात भटक्या कुत्र्यांची एक प्रकारे दहशत निर्माण झाली असून, महापालिकेने तातडीने दखल घेत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा