बेनके गुरूजी यांचे मरणोत्तर नेत्रदान

अहमदनगर-जुन्या पिढीतील एक आदर्श विद्यार्थीप्रिय शिक्षक, गोसेवक, सामाजिक भावनेने योगदान देणारे तुकाराम भाऊ बेनके (गुरूजी) यांच्या वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकाळाने अकोले येथे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे लोणी- प्रवरानगर येथील नेत्र पेढीच्या माध्यमातून मरणोत्तर नेत्रदान करून घेतले आणि समाजाला नेत्रदान करण्याची प्रेरणा दिली. त्यांनी त्यांच्या पत्नी स्व. सौ. शकुंतला बेनके यांचे मरणोत्तर नेत्रदान घडवून आणले. नेत्रदान हे अभियान व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या पश्चात एस.टी. महामंडळातील सेवानिवृत्त मुख्य लेखाधिकारी सुभाष बेनके, श्री स्वामी समर्थ क्लॉथसेंटर अकोलेचे चालक व शिक्षक चंद्रशेखर बेनके, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक सुनिल बेनके ही तीन मुले आणि चार मुली,सुना, नातवंडे आहेत.

त्यांनी राजूर येथे आदर्श शिक्षक म्हणून जवळपास 20 वर्ष अध्यापन सेवा केली. दुरावस्थेला गेलेली मवेशी येथील शाळा त्यांच्या मुख्याध्यापक काळात त्यांनी आदर्श करून दाखवली. शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून ते मवेशी येथून मार्च 1992 रोजी सेवा निवृत्त झाले. सेवा निवृत्ती नंतर त्यांनी गोधाम गोशाळा उभारणीला मोठे आर्थिक योगदान दिले. विविध सेवाभावी संस्थांना त्यांनी आर्थिक सहयोग दिला. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी आपले इच्छापत्र तयार करून आपली स्व कमाईची संपूर्ण स्थावर जंगम ही सेवा कार्याला देऊ केली. वैयक्तिक नावाने ट्रस्ट काढण्याची इच्छा नसतानाही एका आदर्श व्यक्तिची समाजाला प्रेरणा मिळावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनिल बेनके यांनी सौ. शकुंतला व तुकाराम बेनके गुरूजी सोशल ट्रस्ट ही सेवाभावी संस्था स्थापन करून समाजाला विधायक असे सेवा कार्य पुढे नेण्याचा संकल्प मुलांनी केला आहे. त्यांनी आपल्या नातवाच्या विवाहप्रसंगी विविध सेवाभावी संस्थांना पावणे दोन लाख रूपयांचा सामाजिक निधी प्रदान केला होता. आपण सर्वांनी व कौटुंबिक जबाबदारी संपलेल्या ज्येष्ठांनी आपल्या कमाईतून समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी सामाजिक कृतज्ञता निधी देत राहावा यासाठी ते कायम इतरांना प्रोत्सहित करीत असे. समाजातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा