शोध जीवसृष्टीचा

परग्रहवासी किंवा एलियन्सच्या अस्तित्वाचं गूढ अजूनही कायम आहे. काही जण उडत्या तबकड्या किंवा एलियन्स दिसल्याचा दावा करतात. पण पृथ्वीपलीकडे अंतराळातल्या दुसर्‍या ग्रहावर जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या खुणा अद्याप सापडलेल्या नाहीत. मात्र पृथ्वीप्रमाणेच जीवसृष्टीला पोषक अशा वातावरणाचा शोध सतत सुरू असतो. नासाच्या शास्त्रज्ञांनी मध्यंतरी एका ग्रहाचा शोध लावला. हा ग्रह पृथ्वीशी साधर्म्य साधणारा असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या ग्रहावर माणसाला रहाण्यासाठी पोषक वातावरण असल्याचा त्यांचा दावा आहे. या ग्रहावरचं तापमान 0 ते 40 अंश सेल्सियसदरम्यान असतं. या ग्रहाला ‘केटू 18 बी’ असं नाव देण्यात आलं आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 111 प्रकाशवर्षं लांब आहे. ‘केटू 18 बी’ हा आपल्या सूर्यमालेबाहेरचा ग्रह आहे. त्याचा आकार पृथ्वीपेक्षा दुप्पट आहे. तसंच त्यावर पाणीही आहे. त्यामुळे तिथे जीवसृष्टीचं अस्तित्व असू शकतं किंवा पोषक वातावरणामुळे माणूस तिथे राहू शकतो, असं शास्त्रज्ञांना वाटतंय. पण त्याची सध्या तरी पृथ्वीशी तुलना करता येणार नाही. तसंच हा ग्रह पृथ्वीपासून बराच लांब असल्यामुळे तिथे पोहचून शोधही घेता येणार नाही, असं शास्त्रज्ञ सांगतात. या ग्रहाचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या अडीच पट आहे. तसंच त्या भोवती वायूचे जाड थर आहेत. त्यामुळे आत्ताच कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही, असंही शास्त्रज्ञ सांगतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा