साथीचे आजार रोखण्यासाठी शहरात ‘फाईट टू बाईट’ अभियान राबविणार

(छाया – लहू दळवी,अहमदनगर)  

अहमदनगर- शहर आणि उपनगरां- मध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणियासह साथीच्या आजारांचा वेगाने फैलाव होत असून, त्याबाबत तातडीने उपाययोजना सुरू करण्याच्या सूचना आ. संग्राम जगताप यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार किटकजन्य आजाराच्या विरोधात शहरात ‘फाईट टू बाईट’ अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी दिली आहे. शहर आणि उपनगरांमध्ये डेंग्यू, चिकनगुणिया, मलेरिया रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासंदर्भात ‘नवा मराठा’ने सोमवारी (दि. 13) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आ. संग्राम जगताप यांनी मंगळवारी (दि. 14) मनपा आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करत विविध सूचना केल्या. शहरात साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया आजारात रुग्णांच्या शरीरातील पांढर्‍या पेशी कमी होतात त्यामुळे गोरगरीब रुग्ण घाबरून जातात आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. त्यांच्यावर मोठा आर्थिक ताण पडतो. त्यामुळे या साथीच्या आजारावर तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात, अशी सूचना आ. जगताप यांनी केली.

(छाया – लहू दळवी,अहमदनगर) 

त्यावर आयुक्त गोरे यांनी यासंदर्भात लगेचच उपाययोजना करण्यात येतील. औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात येईल. डेंग्यूबाबत जनजागृतीसाठी पोस्टर छापून ते विविध ठिकाणी लावण्यात येतील. जेणेकरून नागरिकांमध्ये जागृती निर्माण होईल. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे स्वच्छ पाणी अधिक काळ नागरिकांनी साठवून ठेवू नये. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळण्याबाबत आवाहन करण्यात येईल. घंटागाड्यांवर जनजागृतीचे फ्लेक्स तसेच सीडी वाजविण्याबाबत सूचना करण्यात आल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले. यावेळी आ. जगताप यांनी कोविड काळात शहरात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल महापालिका आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांचे कौतुक केले. आजही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढलेले दिसत असले तरी शहरात मात्र ती संख्या कमी आहे. याचा अर्थ कोरोना रुग्णसंख्या नियंत्रित करण्यात आपल्याला यश आले आहे. यात महापालिका आरोग्य विभागाचे चांगले काम आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण सुरू आहे. लस घेतलेली नाही त्यांनी लस घ्यावी, असे आवाहन आ. जगताप यांनी यावेळी केले.

रस्त्यांच्या पॅचिंगचे काम लवकरच सुरू होणार

शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम तातडीने हाती घेण्याची सूचना आ. जगताप यांनी केली. त्यावर पॅचिंगच्या कामाची पूर्ण तयारी झाली असून, पाऊस थांबल्यास लगेचच ते काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती आयुक्त गोरे यांनी यावेळी दिली. शहरातून जाणार्‍या कल्याण रोडच्या दुरावस्थेचा विषय बैठकीत घेण्यात आला. शिवाजीनगर ते नेप्ती नाका चौक ते आयुर्वेद कॉर्नरपर्यंत या रस्त्याची मोठी दुर्दशा झालेली आहे. सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार आठ दिवसात हाती घेईल. पाऊस थांबल्यानंतर दर्जेदार काम करून घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. बैठकीस आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, नगरसेवक मनोज दुलम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा