व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्ती संदर्भात लवकर निर्णय घेऊ-मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आश्‍वासन

अहमदनगर- महाराष्ट्रात एकूण 5 विभाग असून त्यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर यात एकूण 1529 विविध व्यवसायिक अभ्यासक्रम शिकविण्यार्‍या संस्था आहेत. यात एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनॅजमेण्ट, आर्किटेक्चर असे अभ्यासक्रम येतात. हे सर्व अभ्यासक्रम कायम विनाअनुदानित तत्वावर शिकविले जात असून शासनाकडून कुठल्याही स्वरूपाचे अनुदान मिळत नाही. या अभ्यासक्रमासाठी विविध आरक्षणातून इबीसी, ओबीसी एससी, एसटी, एनटी या शिष्यवृत्तीच्या आधारे 70 ते 80 टक्के विद्यार्थी प्रवेश घेतात व या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शासनाकडून संस्थेला दिली जाते. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील व्यायवसायिक अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्ती अद्याप मिळाल्या नसल्याने संस्था चालविताना अनेक अडचणी येत आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्ती लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना प्रा. विजय शिंदे यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री तनपुरे नियोजित कामासाठी आलेले असताना हे निवेदन देण्यात आले. सन 2020 – 21 या शैक्षणिक वर्षातील व्यायवसायिक अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्ती मिळाल्या नसल्याने निर्माण होत असलेल्या अडचणी त्यात नमूद करण्यात आलेला आहेत असे शिंदे म्हणाले.

या सर्व संस्थांमध्ये हजारो कर्मचारी काम करत आहेत. सर्व कर्मचार्‍यांचे संस्थेत हजर राहून ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे काम चालू असून कामामध्ये कुठेही उणीव भासू दिलेली नाही. परंतु शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्यामुळे मागील काही महिन्यांपासून कर्मचार्‍यांना काही ठिकाणी 50 टक्के तर काही ठिकाणी त्याहून कमी पगार दिला जात आहे. कोविड 19 च्या काळात या कर्मचार्‍यांना देखील आजाराला सामोरे जावे लागले असून त्यामुळे आर्थिक ओढाताण झालेली आहे. जो पर्यंत शासन शिष्यवृत्तीची रक्कम अदा करत नाही तो पर्यंत पूर्ण पगार देता येणार नसल्याचे संस्था सांगत आहेत. या अभ्यासक्रमाच्या कर्मचार्‍यांची कोणतीही संघटना नसल्यामुळे त्यांच्या अडचणींकडे कुणाचेही लक्ष नाही. तरी लवकरात लवकर शिष्यवृत्तीची रक्कम मिळावी जेणे करून संपूर्ण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कर्मचार्‍यांना दिलासा मिळेल अशी विनंती शिंदे यांनी पत्रात केली आहे. शिष्यवृत्तीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आश्वासन दिले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा