गाढव आणि लांडगा

एका रानात खूप प्राणी राहत होते. त्यांत एक चांगले धष्टपुष्ट गाढव आणि एक लांडगाही राहत होता. एकदा लांडग्याने त्या धष्टपुष्ट गाढवाला चरताना पाहिले. याचे थोडे जरी मास खायला मिळाले, तर काय मजा येईल, असा विचार लांडग्याच्या मनात येताच त्याच्या तोंडाला पाणी सुटले. या गाढवाला कसे फसवावे, याचा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने एक बेत रचला. लांडग्याने वैद्याचे सोंग घेतले आणि सर्व प्राण्यांना कळविले की, ‘‘मी अनेक देशांत हिंडून-फिरून सर्व औषधांची माहिती घेतली आहे. माझ्याकडे सर्व रोगांवर रामबाण औषधी वनस्पती आहेत. प्राण्यांचे सर्व रोग मी बरे करू शकतो.’’

लांडग्याचा आपल्यावर डोळा आहे, फसवून माझे मांस त्याला खायचे आहे; म्हणूनच त्याने हे ढोंग रचले आहे, हे गाढवाने ओळखले आणि त्या लांडग्याला चांगली अद्दल घडवावी, असा विचार गाढवाच्या मनात आला. मग भोळेपणाचा आव आणून गाढव खोटेच लंगडत-लंगडत लांडग्यापुढे गेले आणि म्हणाले, ‘‘वैद्यमहाराज, माझ्या पायात काटा घुसल्याने मी अगदी वैतागून गेलो आहे. कृपा करून त्यावर काही उपाय करा.’’ यावर लांडगा साळसूदपणा दाखवित म्हणाला, ‘‘अरे मित्रा, असा माझ्याजवळ ये; म्हणजे मला तुझा पाय चांगला पाहता येईल.’’ लांडगा असे म्हणताच गाढव त्याच्याजवळ गेले आणि आपल्या मागच्या पायाची अशी सणसणीत लाथ लांडग्याच्या तोंडावर हाणली की, ह्या तडाख्याने त्याचे तोंड फुटून तो मोठमोठ्याने आकांत करू लागला. असे पाहताच गाढवाने धूम ठोकून तेथून पलायन केले; आणि जाता-जाता म्हणाले, ‘‘मला फसवतोस काय लबाडा! आता बस कोकलत.’’

तात्पर्य – आपल्यापेक्षा सवाई कोणी तरी भेटतोच.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा