कासा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात साडेसात लाख फळझाडे लावण्याचा शुभारंभ

अहमदनगर- कासा (चर्चेस ऑक्झीलीअरी फोर सोशल अँक्शन) संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून, संस्थेचा अमृतमहोत्सवी वर्ष पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाने साजरा केला जाणार आहे. संस्थेच्या वतीने संपुर्ण देशात साडे सात लाख तर महाराष्ट्रात एक लाख झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानाचे शुभारंभ अकोले तालुक्यातून बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते वृक्षरोपणाने करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी देशातील व महाराष्ट्रातील कासा संस्थेचे प्रमुख पदाधिकारी हजर होते. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सवर संवाद साधताना कार्यक्रम प्रमुख डॉ. जयंत कुमार म्हणाले की, कासा मनुष्यबळ विकास संस्था संपुर्ण देशात कार्यरत आहे. संस्थेच्या स्थापनेला 75 वर्ष पुर्ण होत आहे. यानिमित्ताने देशभरातील 21 राज्यांमधून संस्थेच्या माध्यमातून सात लाख पन्नास हजार झाडे लावण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. ही वृक्षलागवड सावर्जनिक, सामुहिक वन क्षेत्र व वैयक्तिक क्षेत्रावर लोकसहभागाने करण्यात येणार आहे. झाडे लावण्याबरोबर त्याच्या संवर्धनासाठी देखील लक्ष दिले जाणार आहे. या वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावून फळझाडांपासून शेतकरी व गरजू घटकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे म्हणाल्या की, आरोग्याच्या दृष्टीने देशी वाण व बियांचे जतन करुन त्याची लागवड करणे काळाची गरज बनली आहे. कोरोना महामारीमुळे आरोग्याबाबत जागृकता निर्माण झाली. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गावरान देशी बियांपासून मिळणारा भाजीपाला, फळे उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. तर पर्यावरण संवर्धनासाठी कासा संस्थेने राबविलेला उपक्रम दिशादर्शक असल्याचे स्पष्ट केले. कासा पश्चिम विभागाचे मुख्य विभागीय अधिकारी के. व्ही. थॉमस यांनी संस्थेचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा होत असताना वृक्षरोपणाबरोबर समाजातील दुर्बल घटकांना प्रवाहात आनण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले व वृक्षरोपणाचे नियोजनाची माहिती दिली. या व्हिडिओ कॉन्फरन्सला अहमदनगर, औरंगाबाद, बीड, लातूर, गोंदिया, नंदुरबार तसेच गुजरात मधील उमरपाडा व डेदियापडा आदींसह इतर संलग्न संस्था व कार्यकर्ते ऑनलाईन हजर होते. अकोले येथे झालेल्या वृक्षरोपण कार्यक्रमासाठी कासा पश्चिनम विभागाचे प्रकल्प अधिकारी जॉय्सिया थोरात, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गायकवाड, समन्वयक प्रभाकर दळवी, अस्मिता ढोले उपस्थितीत होते. व्हिडिओ कॉन्फरन्सचे तांत्रिक काम वैशाली कदम यांनी पाहिले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा