मधुमेहाकडे दुर्लक्ष नको!

मधुमेह असलेल्या मातांच्या मुलांना भविष्यात दृष्टी कमी होण्याचा धोका 39 टक्के जास्त असतो. अशा मुलांच्या डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांनी त्यांच्या अलीकडील संशोधनात हा दावा केला आहे. गर्भवती महिलांमधल्या मधुमेहाचा परिणाम भविष्यात मुलांमध्ये दिसू शकतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे. मधुमेही आईमुळे किती मुलांमध्ये जोखीम वाढते, मुलांमधला धोका कसा कमी करावा, या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी संशोधन करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या पथकाने डेन्मार्कमधल्या 553 मुलांचा अभ्यास केला. मधुमेह गर्भधारणेदरम्यान झाल्यास वैज्ञानिकदृष्ट्या गर्भकालीन मधुमेह म्हणतात. हे संशोधन पूर्ण झाल्यानंतर या 553 मुलांची तुलना इतर 20 हजार मुलांशी करण्यात आली. त्यांच्या मातांना गर्भधारणेदरम्यान मधुमेह नव्हता. संशोधकांनी पुढील 25 वर्षं या 553 मुलांचं निरीक्षण केलं.

चीनमधल्या नानजिंग मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि संशोधन संघाचे प्रमुख डॉ. जियांगबो डू यांच्या मते, मधुमेही मातांच्या मुलांना अपवर्तक त्रुटीचा धोका 39 टक्के जास्त असतो. हे घडतं तेव्हा डोळे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. परिणामी, मुलाला गोष्टी स्पष्टपणे पाहता येत नाहीत. डॉ. जियांगबो म्हणतात की मधुमेहाशी निगडित गुंतागुंत जशी मातांमध्ये वाढते, तसा मुलांमध्ये दृष्टी कमी होण्याचा धोकाही वाढतो. टाईप 2 मधुमेह असलेल्या मातांच्या मुलांमध्ये हा धोका थोडा कमी असतो. हे धोके टाळण्यासाठी महिलांनी दोन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, असं डायबेटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनात म्हटलं आहे. गर्भधारणेपूर्वी आणि दरम्यान महिलांनी आपल्या रक्तातल्या साखरेची तपासणी करणं आवश्यक आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणतीही कृती केली पाहिजे. दुसरं म्हणजे, लहानपणापासूनच आपल्या मुलांचे डोळे वारंवार तपासले पाहिजेत. त्यामुळे जोखीम कमी होते. ब्रिटनमधल्या रिसर्च कम्युनिकेशन्सच्या प्रमुख डॉ. लुसी चेंबर्स म्हणतात की हे संशोधन महत्वाचं आहे. कारण ते मधुमेही मातांच्या मुलांच्या डोळ्यांच्या समस्यांचे पुरावे प्रदान करतं. गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंत दूर करण्यासाठी आणि निरोगी बाळासाठी तज्ञांच्या सल्ल्याने रक्तातली साखर नियंत्रणात ठेवली पाहिजे. दरम्यान, मधुमेहाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी शास्त्रज्ञ कृत्रिम स्वादूपिंडाची चाचणी घेत आहेत. यामुळे विशेषत: टाइप -2 मधुमेहाचे रुग्ण आणि किडनी डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णांना आराम मिळेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा