सावेडी उपनगरात एकाच रात्री चार घरफोड्या तर सोमवारी दुपारी व्यापार्‍याचे 5 लाख पळवले

(छाया-बबलू शेख,अहमदनगर)

अहमदनगर- तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेला सावेडी उपनगर परिसर घरफोड्या आणि लुटमारीच्या घटनांनी हादरुन गेला आहे. उपनगरात सोमवारी (दि.2) पहाटे चार घरफोड्या तर भरदुपारी व्यापार्‍याची 5 लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे.

सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील नामदेव चौक, संदेशनगर परिसरात चोरट्यांनी 2 घरे, 1 बेकरी व एका पतसंस्थेचे कार्यालय फोडून चोर्‍या केल्याची घटना सोमवारी पहाटे 1.30 च्या सुमारस घडली. संदेशनगर येथील डॉ. कंक व श्री. झेंडे यांची बंद घरे चोरट्यांनी फोडत घरातून मोठा ऐवज चोरुन नेला. त्यानंतर जवळच असलेल्या निलेश पालवे यांच्या मालकीची बेकरी फोडून बेकरीच्या गल्ल्यातील 25 ते 30 हजार रुपयांची रोकड पळवली. त्यानंतर त्या शेजारीच असलेल्या श्रीराम नागरी पतसंस्थेचे कार्यालयही चोरट्यांनी फोडले आहे. सकाळी या चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तोफखान्याचे पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पथकासह जावून पाहणी केली. बेकरीच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. त्यात 1 जण कैद झाला आहे मात्र त्याने सीसीटीव्ही कॅमेर्‍याची केबल तोडल्याने कॅमेर्‍यातून होणारे चित्रीकरण बंद झाले. त्यामुळे चोरटे किती होते व कोण होते? याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू केले आहे.

व्यापार्‍याची 5 लाखाची बॅग प्रेमदान चौक परिसरात पळवली

चार घरफोड्यांनी सावेडी उपनगर परिसर हादरलेला असताना व या घरफोड्यांचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सोमवारी दुपारी 1.10 च्या सुमारास प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी रस्त्यावर व्यापार्‍याची 5 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग मोटारसायकलीवर भरधाव वेगात आलेल्या दोघा चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे. किशोर अमृतलाल पोखरणा (रा.गुलमोहोर रोड) हे प्रेमदान चौक परिसरातील स्टेट बँकेतून बांधकाम व्यावसायिकाला देण्यासाठी खात्यातून 5 लाख रुपये काढून मोटारसायकलवर घराकडे जात असताना प्रेमदान चौकाच्या पुढे गेल्यावर पाठीमागून मोटारसायकलवर हेल्मेट घातलेले दोघे जण आले व त्यांनी पोखरणा यांच्या मोटारसायकलला अडकवलेली रोकड असलेली बॅग हिसकावून भरधाव वेगात निघून गेले. याबाबतची माहिती व्यापारी पोखरणा यांीन तोफखाना पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पाहणीसाठी आले होते. दुपारी उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दुचाकीवरील महिलेची बॅग पळविली

दुचाकीवर चाललेल्या महिलेची रोख रक्कम व मोबाईल असा 46 हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग पाठीमागून भरधाव वेगात मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी पळवून नेल्याची घटना शनिवारी (दि.31) दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास बंधन लॉनच्या शेजारी असलेल्या कृष्णा हॉटेल समोर रस्त्यावर घडली. याबाबत सुजाता दगडू पाचारणे (रा.भिस्तबाग, अहिल्यानगरी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरोधात भा.दं.वि.क. 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

नवनागापूर येथे 50 हजारांची घरफोडी

अहमदनगर- अहमदनगर एमआयडीसी परिसरातील नवनागापूर येथे तेथील चौधरी ट्रान्सपोर्टच्या पाठीमागे दत्तनगर येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरफोडी करत रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा 50 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रविवारी (दि.1) पहाटे घडली. याबाबत प्रदीप दिलीप लोखंडे (रा.दत्तनगर, नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागीने चोरुन नेले असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 380, 457 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बायपास रोडवरुन मोटारसायकल पळविली

अहमदनगर- रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या एम आयडीसीतील कामगाराची मोटारसायकल अज्ञात इसमांनी पळवून नेल्याची घटना शनिवारी (दि.31) रात्री 11.45 च्या सुमारास एमआयडीसीतील केडगाव बायपास रस्त्यावर घडली. याबाबत अमोल जयसिंग काळे (वय 29, रा.अस्तगाव, ता.पारनेर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळे हे एमआयडीसीत कामगार असून शनिवारी रात्री कंपनीतून कामावरुन सुटल्यानंतर ते मोटारसायकलने घरी जात असताना बायपास रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाच्या पुढील बाजूस लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले. त्यावेळी गाडीला चावी तशीच होती. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी काळ्या रंगाची होंडा कंपनीची सिबी शाईन मोटारसायकल (क्र.एम.एच.16, बी.टी.5846) ही पळवून नेली. या मोटारसायकलच्या डिक्कीत त्यांचे पाकीटही होती. त्यात आधार कार्ड, बँकेचे एटीएम कार्ड व 500 रुपयांची रोकड होती. या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा