पोस्टाच्या कार्यालयात नागरिकांना मिळणार गंगा नदीचे पवित्र जल

भारतीय डाक विभागाने श्रावण महिन्यासाठी केली भाविकांची सोय

अहमदनगर – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून देशभरातील पर्यटन, देवदर्शन ठप्प झालेले असताना येत्या श्रावण महिन्यासाठी भारतीय डाक विभागाने भाविकांची अडचण ओळखून गंगा नदीचे पवित्र जल पोस्टाच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. पवित्र गंगाजलची 250 मिली ची बाटली अवघ्या 30 रुपयांत भाविकांना उपलब्ध होणार आहे.

भारतीय संस्कृती मध्ये गंगा नदीचे जल म्हणजे पवित्र जल मानले जाते. अनेक धार्मिक विधी मध्ये या गंगा नदीच्या पवित्र पाण्याला खूप महत्त्व आहे. परंतु हे जल प्रत्येकाला सहजासहजी आपल्या घरामध्ये उपलब्ध करता येत नाही. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन भारतीय डाक विभागाने श्रावण महिन्यामध्ये खास देशातील सर्व नागरिकांसाठी पवित्र असणारे गंगाजल आता संपूर्ण देशात पोस्टामार्फत उपलब्ध करून दिले आहे. हे गंगाजल आता देशातील बहुतांश पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व श्रीरामपूर येथील प्रधान डाक कार्यालयात आता गंगाजल मिळणार आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणी असणार्‍या सर्व पोस्ट ऑफिस मध्ये देखील याचा पुरवठा करण्यात आलेला आहे. तरी श्रावण महिन्यामध्ये नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक एस. रामकृष्णा यांनी केले आहे. सदरचे गंगाजल थेट गंगोत्री येथील असून ते उत्तर काशी येथून पॅकिंग करून देशातील विविध भागांमध्ये वितरीत केले जाते. सध्या गंगाजल 250 मिली च्या प्लास्टिक बाटलीमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत फक्त 30 रुपये आहे, अशी माहिती डाक निरीक्षक संदीप हदगल यांनी दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा