राज्यभरातील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयांचे अनुदान दीड वर्षापासून थकित – अनुदान व मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची शिक्षक परिषदेची मागणी

अहमदनगर – शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारींचा खोळंबा थांबविण्यासाठी राज्यभरातील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयास अनुदान उपलब्ध करुन पुरेश्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिले आहे. तसेच वीज बिल न भरल्याने वाशिम जिल्हा अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाची एक महिन्यापासून वीज तोडण्यात आली आहे. मनुष्यबळ नसल्याने तेथील अनेक कामे खोळंबली असून, सदर कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिला असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. राज्यभरातील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयांना दीड वर्षापासून अनुदान नसल्याने वीज बिल, कार्यालयीन खर्च व भाडे थकले आहेत. राज्यभरातील काही वेतन पथक अधीक्षक कार्यालय भाड्याने आहेत. दीड वर्षापासून अनुदान नसल्याने कार्यालय खाली करण्यासाठी अथवा भाडे भरण्यासाठी जागा मालकांनी तगादा लावला आहे. शिक्षणाधिकारी कार्यालय व वेतन पथक कार्यालय एकाच कामाचा भाग असून, दोन्ही एकमेकांपासून दूर असल्याने वेळेचा अपव्यय होतो. दोन्ही कार्यालय एकाच वास्तूत असण्याची गरज असल्याचे शिक्षक परिषदेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या बदल्यांचा काळ असून, अधिकारी आपल्या परीने चांगल्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी शिफारशी मिळवत आहेत. त्यामुळे लहान व मागास जिल्ह्यातील पदे रिक्त राहिल्याने त्याचा शिक्षणावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. राज्यभरातील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयास अनुदान देऊन पुरेश्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयास अनुदान नसल्याने कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली आहे. दीड वर्षापासून कार्यालयाचा खर्च भागविण्यास तारेवरची कसरत सुरु आहे. तसेच कार्यालयात मनुष्यबळ अपुरे असल्याने अनेक कामे रेंगाळली जात आहे. कार्यालय असून देखील नसल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे. सदर विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कर्मचारी अभावी कामे न होणार्‍या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयास टाळे ठोकणार आहे. -शिवनाथ दराडे (मुंबई विभाग कार्यवाह, शिक्षक परिषद).

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा