‘तो’ वैचारिक कुंभकर्णांचा कुंभकोरोना मेळा

फक्त आपला देशच नव्हे तर अवघे विश्व ज्या महामारीच्या विळख्यामध्ये गेल्या 18 महिन्यांपासून प्रत्येक क्षणाला मृत्यूच्या घटका मोजत आहे, आणि ज्या महामारीचा संसर्ग आणि प्रसार यापासून बचाव करण्यासाठी अत्यावश्यक उपाय म्हणून केवळ ज्या सोशल डिस्टंसिंगचे कळकळीचे आवाहन आणि निर्बंध जगभरामध्ये चालू असताना, आपल्या या हेकट धर्मवेड्या देशामध्ये एकट्या हरिद्वारमध्ये जर पन्नास लाख लोक गंगेमध्ये स्नान करून मोक्ष मिळवण्यासाठी एकत्र येतात, कुंभमेळ्याच्या निमित्ताने सगळे कायदे कानून, आदेश आणि यंत्रणा धाब्यावर बसवून जर उत्सव करतात, तेव्हा निश्चितच आपली आपल्यालाच सर्वांना लाज वाटायला हवी. अमुक आखाडा आणि तमुक आखाडा आणि त्यांचे ते स्वयंघोषित प्रमुख संत महंत यांचा खरं म्हणजे या समाजव्यवस्थेशी व दैनंदिन दुनियेशी तसं पाहिलं तर खर्‍या अर्थाने दूरदूरपर्यंत काहीही थेट संबंध नाही. अशा लोकांच्या झुंडी निव्वळ धर्माच्या नावाखाली झुंडशाही करून इतक्या महाभयानक परिस्थितीमध्ये देखील, ही धर्म नावाची अफुची गोळी स्वतः खाऊन आणि इतरांनाही प्रेरित करून, मोक्षच नव्हे तर या जगातुनच सर्वांना उठवण्यासाठी एकप्रकारे हातभार लावत असतील, तर या अज्ञानी आणि धर्मवेड्या समाजविघातक झुंडीचा विरोध तर बुध्दीने करायला हवाच, परंतु त्याचबरोबर या झुंडीसमोर नतमस्तक होणार्‍या तथाकथित शासन व प्रशासनाचा देखील तीव्र निषेध करायला हवा.

कारण या प्रकाराला केवळ राजकारण मतपेटी आणि बिन्डोक लोकांच्या विरोधामुळे होणारा उद्रेक या तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच प्रशासनाकडून सोईस्कर कानाडोळा केला गेला, आणि या तीन गोष्टींमुळेच अशा इतरही बर्‍याच धर्मांच्या झुंडीच्या कारवायांकडे आजवर दुर्लक्ष केले जाते आहे, अन्यथा जर आपण देशावर आज असलेल्या अभुतपुर्व भयाण आणीबाणीचा विचार केला, तर आणि अतिशय कडक निर्बंधांची अंमलबजावणी करायचीच म्हटल्यावर, लष्कराची देखील मदत घेत असतो. अशावेळी आपला देश आणि त्या देशावर जर खरं खरं प्रेम असेल तर निरपराध नागरिकांना वाचवण्यासाठी तरी सर्वच धर्माच्या कैवारी धेंडाकडून ते उफाळून यायला हवं होतं, आणि हा वैचारिक कुंभकर्णाचा कोरोनाकुंभमेळा काहीही करून टाळायला हवा होता. कशाचे शाही स्नान? आणि कशाचा मोक्ष? इथे स्मशानभूमी कमी पडू लागली आहे.. असा प्रेतांचा खच पडलेला असताना, श्वास घ्यायला ऑक्सिजन मिळत नसताना, कसला मेळा?

आणि कसला मोक्ष? आणि जर मोक्ष मिळवायची एवढी तीव्र इच्छा असेल तर आपल्या देशामध्ये स्वयंसेवकांची या महामारीमध्ये जी कमतरता आहे ती या धर्मवेड्यांनी स्वयंस्फूर्तीने भरून काढायची होती… वेगवेगळ्या कोरोना सेंटरमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करायचे होते, आणि जर या महामारीमध्ये रुग्णांची सेवा करता करता मृत्यू आला असता, तर मोक्ष मिळालाच असता की….. त्यासाठी गंगेत स्नान करायची काय आवश्यकता आहे? वास्तविक पाहता कुठलाही धर्म असले फालतू वैचारिक अधिष्ठान देऊ करत नाही, पण संपूर्ण जग एकीकडे लयाला चाललेले असताना ते वाचवण्यासाठी विज्ञानाची पराकाष्ठा होत असताना, असला रानटीपणा व वेडेपणा फक्त आपल्याच देशात घडू शकतो, माझा श्रेष्ठ का तुझा श्रेष्ठ? अशा धर्मांध घटना कुठल्या धर्माच्या समुदायाकडून आणि कुठल्या झुंडीकडून घडतात याला महत्त्व नसून, तो राजकारणाचा विषय जर खर्‍या अर्थाने बाजूला ठेवला तर या घडलेल्या घटनेचे कुणीच समर्थन करणार नाही. 2020 मध्ये दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या त्यावेळेच्या तब्लिगी घटनेबाबत देखील मी असा लेख लिहिलेला होता. इथे आपण नुसते एकमेकांकडे बोट दाखवून यातच धन्यता मानतो, हीच खरी आत्महत्या आहे, आता बाहेर येणार्‍या आकडेवारी वरून त्या 50 लाख कुंभकर्णी लोकांमध्ये प्राथमिक दृष्ट्या 17000 लोक बाधित सिध्द झालेले असून त्या आखाड्याचे प्रमुख म्हणून जे विद्वान होते त्यांचा देखील या कोरोनाने अंत झालेला आहे, एकेक बाधित व्यक्ती 25 जणांना सहज बाधित करू शकतो हे गणित जर मांडले तर हे 17000 बाधित केवढा मोठा अणुस्फोट करतील? हा आकडा कितीपर्यंत जाईल याची कल्पना करा? तरी देखील उगीच कुणी जर धर्माच्या, परंपरेच्या, राजकारणाच्या, कशाचाही आड लपून याचं जर समर्थनच करू इच्छित असतील व कुणाचे निष्पक्ष डोळे अजुनही उघडत नसतील तर, तो परमेश्वर नावाचा प्राणी जर कुठे असेल तर तो देखील आपल्या देशाला वाचवु शकणार नाही.

सुहास मुळे, 9823722212

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा