साहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’

वर्षानुवर्षे मी पाहतोय त्याला. अगदी आजही तश्शीच- तीच गरिबीची परिस्थिती. प्रयत्न करतोय परिस्थितीवर मात करण्याचा. परिस्थिती थोडीशी बरी व्हायला लागली की अपघात, आजारपण, कौटुंबिक वाद ह्यांचं आगमन ठरलेलंच. खरंतर लढाई हा शब्द उच्चारला की आपल्याला रणांगण, घोडे, ढाली, तलवारी, सैन्य हेच चित्र डोळ्यांसमोर येतं. खरं तर आजचा काळ हा रणांगणात लढाईचा काळ नाहीय. राज्य, राजा हा प्रकारच अस्तित्वात राहिला नाही. आज गरिबाला लढावं लागतंच वीतभर पोटासाठी. रात्रंदिन आम्हा पोटासाठी लढाईचा प्रसंग. तसं पाहिलं तर श्रीमंतालाही लढावंच लागतं अधिकाधिक पैसा मिळवण्यासाठी, अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी. लढणं गरिब आणि श्रीमंतांच्या नशिबी आहेच. परिस्थिती बदलण्यासाठी. एकदा मी अगदी ठरवून ‘त्याच्या’ झोपडीत गेलोच. छानसं हसुन त्यानं माझं स्वागत केलं. मला पाणी दिलं, चहा दिला. त्याच्याकडं येण्यामागचं कारण सांगितलं. तो म्हणाला की एखाद्याच्या नशिबात फक्त आणि फक्त लढणंच असतं. तो मीच असावा. असो.

आता लढण्याची एवढी सवय झालीय की लढणं हे रक्तातच मिसळलंय. एक आवर्जुन सांगावसं वाटतं ह्या दररोजच्या लढण्यामुळंच माझ्यात आत्मविश्‍वास निर्माण झाला आणि वाढला. मी जास्तीत जास्त कसं लढु शकेल, ह्या परिस्थितीच्या विरोधात, हे लढण्यामुळंच मला समजु लागलंय. माझ्यात जिद्द निर्माण व्हायला लढणंच कारणीभुत आहे. मी आता कोणत्याही संकटाला घाबरत नाही कारण घाबरणं रक्तातून कधीच नाहिसं झालंय. आता असं वाटु लागलंय लढलो नाही तर कदाचित जगणार नाही. लढणं ही फक्त क्रिया राहिली नाही तर तो माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. झोपडी ऐवजी विटांचं घर इथं कधी अवतरणार हे मी ठामपणे सांगु शकणार नाही पण मी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढणार हे मी ठामपणे सांगु शकतो. अनेकजण संकटांशी लढायला घाबरतात पण मी घाबरत नाही कारण लढण्यामुळंच माझ्यात लढण्यासाठीची शक्ती निर्माण झालीय. त्याचं ते बोलणं ऐकुन मी थक्क झालो. लढण्यामुळंच बरंच काही होतं, मिळतं हा विचार मी का करत नाही? लढणंच नकोच असं का म्हणतो आपण? लढायच्या आधीच हात,पाय गाळणारे महाभाग भोवताली आहेत ते जर ‘ह्याला’ भेटले तर बरं होईल. लढण्यामुळं जर एखादी व्यक्ती सकारात्मक, स्वीकार करणारी होत असेल तर लढणं चांगलंच आहेना. झोपडीतुन मी निघालो तेव्हा तो फार मोलाचं बोलला. म्हणाला की अंध, मुकी आणि बहिरी असणारी हेलन केलर परिस्थितीच्या विरोधात, शिकण्यासाठी लढली. अंधांसाठी तिनं कार्य केलं. मी तर अंध, मुका, बहिरा नाही. हाती, पायी धड आहे. मी तर लढायलाच पाहिजे कारण हेलन केलर माझ्यासाठी आदर्श आहे, प्रेरणा आहे. मी थक्क. प्रश्‍नार्थक मुद्रेनं मी त्याच्याकडं पाहिलं. तो म्हणाला की एका व्याख्यानात मी हेलर केलर विषयी ऐकलं होतं. वाचनानं माणुस समृध्द होतो हे मी अनुभवतोय पण ऐकण्यानंही समृध्द होणारा माझ्या समोरच. माझ्या अंगावरच्या थ्रीपीसचा मी विचार न करता त्याची गळाभेट घेतली. त्याचं लढणं माझ्यात यावं म्हणुन. तो आजही रडत नाही, लढतोय. तुम्ही लढणार ना?

(लेख क्र.249) – सुनील राऊत माळीगल्ली, भिंगार, अ.नगर. मो. 9822758383

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा