आयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान

13 वर्षाच्या पूर्वाला तिची आई क्लिनिकमध्ये घेऊन आली होती. दोन वर्षापासन मासिक पाळी सुरू झालेल्या पूर्वाचे तेव्हापासून वजन खूप वाढण्यास सुरुवात झाली होती असे तिच्या आईचे म्हणणे होते. दोन वर्षात 42 किलो असलेले वजन सध्या 65 किलोवर आलेले आहे. काळजीच्या सुरातच तिच्या आईने मला विचारले, ‘‘डॉक्टर, पूर्वाचे असेच वजन वाढत राहील का? एवढे वजन असूनही तिला अभ्यास करण्यास उत्साह नसतो. वजन खूप वाढत असल्यामुळे ती इतरांमध्ये मिसळत नाही. सारखी घरातच टीव्ही बघते आणि उरलेल्या वेळात अभ्यास करते. डॉक्टर, प्लीज तुमच्या आयुर्वेदामध्ये या वजन वाढीवर काही उपाय असतील ना? ते उपाय आमच्या पूर्वासाठी उपयोगी पडतील का? काहीतरी आम्हाला उपाय सूचवा?’’

पूर्वाच्या आईचे बोलणे ऐकल्यावर मी त्यांना वजन का वाढते हे समजावून सांगितले. ही समस्या फक्त पूर्वाच्याच बाबती आहे असे नाही, तर या समस्येला सध्याच्या काळात अनेक लहान मुले सामोरे जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, लहान मुलांमधील स्थूलता हा या शतकातील सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्‍न आहे. एकीकडे आपल्या देशात लहान मुलांमधील कुपोषण ही एक मोठी समस्या असताना दुसरीकडे लहान मुलांमधील लठ्ठपणा हा प्रश्‍नही जास्त प्रमाणात उद्भवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार लहान मुलांतील लठ्ठपणाचे प्रमाण 18% इतके आहे.

स्थौल्याची कारणे :

अव्यायामाद्दिवास्वप्नान्मेद्यानां चाति भक्षणात् ।

मेदोवाहिनी दुष्यति वारुणाश्‍च अतिसेवनात ॥

गुरू, मधूर, शील, स्निग्ध अशा पदार्थांचे अति प्रमाणात सेवन करणे, व्यायाम न करणे, दिवसा झोपणे, कोणतीही चिंता न करणे, वार्‍याचे अति प्रमाणात सेवन करणे व आनुवंशिकता म्हणजेच बीजदोष ही स्थौल्याची कारणे आहेत. आयुर्वेदामध्ये स्थौल्यालाच मेदोरोग म्हणतात. वरील कारणांमुळे शरीरामध्ये विकृत मेदूधातूची (चरबीची) वाढ होते. हा वाढलेला विकृत मेदूधातू शरीरातील स्त्रोतसांमध्ये अवरोध निर्माण करतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नापासून रस, रक्त, मांस, अस्थी, मज्जा, शुक्र या धातूंची पुष्टी न होता स्थूलपणा निर्माण होतो. आधुनिक शास्त्रानुसार शरीरातील काही अत:स्त्रावी ग्रंथींच्या अंत:स्त्रावाच्या प्रमाणात बिघाड झाल्यामुळे स्थूलपणा निर्माण होतो. उदा. हायपोथायरॉइडीझम, डाऊन सिंड्रोम, इन्शुलिन निर्माण होण्यात येणारी समस्या.

लहान मुलांमध्ये स्थौल्याच्या कारणांचा विचार केला असता एक गोष्ट लक्षात येते की, यामध्ये अनुवंशिकतेच्या कारणाबरोबरच सधन कुटुंबातील मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. अनेक कुटुंबात आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे बर्‍याच वेळेला मुलं फास्ट फुडचे अति प्रमाणात सेवन करतात. पावभाजी, बर्गर, बटाटा वडा, आईस्क्रीम, चॉकलेट, बिस्किटस्, खारी, ब्रेड, शीतपेये, वेफर्स्, नूडल्स यांसारख्या पदार्थांचे मुलं अति प्रमाणात सेवन करतात. या सर्व पदार्थामध्ये अति प्रमाणात उष्मांक व कर्बोदके असतात. त्यामुळे मुलांना पोट भरल्याची भावना होते. परंतु यामध्ये जीवनसत्व, प्रथिने, खनिजे अजिबातच नसतात. त्यामुळे मुले फक्त लठ्ठ दिसतात परंतु आतून एक प्रकारचे मुलांचे कुपोषणच झालेले असते. लठ्ठपणा असूनही मुलं थोड्याशा कामाने लगेचच दमतात. या दुष्ट चक्रामुळे मुलं मैदानी खेळ खेळत नाहीत. साहजिकच ऊर्जेचा वापर कमी झाल्यामुळे स्थूलपणा आणखीनच वाढतो. अनेक वेळा आईला गर्भावस्थेत मधुमेह असल्यास त्या बाळामध्ये भविष्यात स्थूलपणा आढळून येतो. स्थूल मुलांना खूप भूक लागते व त्यात बरेच मुलं टीव्ही बघताना जेवतात त्यामुळे आपण किती खातो आणि काय खातो हेच मुलांच्या लक्षात येत नाही व त्यामुळे जास्त प्रमाणात आहार घेतला जातो व स्थूलपणा वाढण्यास आणखीच भर पडते. –

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

कालिका प्राईड, लाल टाकी रोड, अहमदनगर मोबाईल नं- 8793400400 वेळ 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा