कोल्ह्याची थाप

एक कोंबडा खुराड्यात राहत होता. एकदा फिरत-फिरत तो बराच दूर आला. आजूबाजूची शोभा पाहण्यासाठी तो एका कुंपणावर चढून बसला आणि मग आनंदाने ओरडू लागला असता त्याचा आवाज ऐकून पलिकडच्या वाटेने चाललेला कोल्हा तिथे आला. कोंबडा कुंपणावर बसलेला पाहताच तो आपल्या तावडीत सापडणार नाही, असे लक्षात येताच कोल्ह्याने एक युक्ती करण्याचे ठरविले.

भोळेपणाचा आव आणीत कोल्हा म्हणाला, ‘‘काय मित्रा, कसा आहेस? तुला पाहून मला फार आनंद झाला. तुला कडकडून आलिंगन द्यावे, अशी माझी इच्छा आहे बघ. तेव्हा मित्रा, खाली उतरुन मला भेट गड्या,’’ त्यावर कोंबडा वरुनच म्हणाला, ‘‘कोल्हेदादा, मलासुद्धा तुम्हाला भेटायला आनंदच वाटला असता. तू माझा मित्र आहेस, म्हणून मला तुझी भीती वाटत नाही. पण मी खाली उतरल्यावर इतर प्राण्यांच्या तावडीत सापडलो, तर ते मला जिवंत सोडतील का? का उगीच मला संकटात लोटतोस? संकटात सापडण्यापेक्षा मी येथेच सुरक्षित आहे.’’ त्यावर कोल्हा म्हणाला, ‘‘अरे तुला भितीचे कसलेही कारण नाही. प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये तसा करार झाला आहे. जो कोणी कराराविरुद्ध वागेल, त्याला कडक शिक्षा होईल, असाही ठराव झाला आहे. ही गोष्ट तर सर्वांना समजली. मग तुलाच कशी कळली नाही?’’ असे दोघांचे बोलणे चालू असता मध्येच कोंबडा वाकडी मान करुन दूरवर पाहू लागला असता कोल्हा म्हणाला,‘‘ मित्रा, वाकडी मान करुन दूरवर काय बघतो आहेस? त्यावर कोंबडा म्हणाला, ’’ अरे भाऊ, तिकडून चार-पाच शिकारी कुत्रे इकडेच येताहेत, असे मला दिसते आहे.’’

कोंबड्याचे हे बोलणे ऐकताच कोल्ह्याची पाचावर धारण बसली. मनात घाबरुन तो म्हणाला,‘‘ अरे मित्रा, असे आहे तर मला येथून गेले पाहिजे. बरं, नमस्कार. हा मी निघालोच बघ. तेव्हा कोंबडा त्याला थांबवीत म्हणाला, ‘‘अरे भाऊ, असे पळतोस कशाला? थोड्या वेळातच मी खाली उतरतो. तू मला कराराची जी गोष्ट सांगितलीस, ती जर खरी असेल, तर तुला भीती वाटण्याचे काही कारण नाही.’’ त्यावर कोल्हा म्हणाला,‘‘ नाही रे बाबा. असा करार झाला आहे हे जरी खरे असले, तरी तो कुत्र्यांना अजून समजला नसेल, तर ते मला ठार केल्याशिवाय सोडतील का?’’ असे म्हणत कोल्ह्याने तेथून पोबारा केला.

तात्पर्य – शेरास सव्वाशेर भेटतो, हेच खरे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा