मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज – ‘मीठा जहर’ म्हणजे काय?

गोड बोलून विश्‍वासघात करणे, म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. अशीच एक वनस्पती आहे. जिचे मूळ गोड लागते, पण खाल्ल्यास प्राणावर बेतते. या विषाला त्यामुळेच ‘मीठा जहर’ असे म्हणतात. ऍकोनिटम नॅपेल्स नावाचे हे झाड हिमालयाच्या प्रदेशात आढळून येते. तसे या झाडाचे सर्वच भाग विषारी असतात; परंतु मूळ जास्त विषारी असते. मुळात ऍकोनिटीन हा अत्यंत विषारी असा घटक असतो. हे एक शोभेचे झाड आहे.

पानात वा इतर पदार्थात मिसळून हे विष खायला देतात. यामुळे ओठ, घसा, जीभ बधिर होणे, लाळ सुटणे, पोटात दुखणे, उलट्या होणे, खूप घाम येणे, चक्कर येणे, दृष्टी व वाचा यावर दुष्परिणाम होणे, हातापायातील त्राण जाणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. अखेर हृदयाच्या स्नायूवर परिणाम होऊन किंवा श्‍वसन थांबून मृत्यू होतो. 1 गॅ्रम वजनाइतके मूळ वा 250 मि.ग्रॅ. इतके ऍकोनाईट खाल्ल्यास सुमारे सहा तासात मृत्यू होतो.

वन्य प्राण्यांना मारण्यासाठी बाणाला लावायच्या विषात याचा उपयोग केला जातो. तसेच खून करण्यासाठी गुन्हेगार याचा वापर करतात. स्वस्त व सहजगत्या उपलब्ध असल्याने विषप्रयोगासाठी याचा जास्त वापर केला जातो. पोटात गेलेले विष टॅनिक ऍसिडचे द्रावण प्यायला देऊन वा पोटॅशियम परमँगनेटचे द्रावण प्यायला देऊन पोटाच्या बाहेर काढतात. हृदय व श्‍वसनसंस्था यांचे कार्य सुरळीत चालावे, यासाठी उपचार करावे लागतात. कृत्रिम श्‍वसन यंत्र व प्राणवायूचा पुरवठा यांचाही उपयोग करतात. असे आहे हे ‘मीठा जहर’; चवीला गोड, पण भयंकर.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा