ठरवलं तर

माणसांनी एकत्र येऊन काही चांगलं करायचं ठरवलं तर काय होऊ शकतं याची अनेक उदाहरणं आपल्याला पहायला मिळतात. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे पुण्यातल्या बाणेर परिसरातली तुकाई टेकडी. ही टेकडी मध्यंतरी डंपिंग ग्राउंड झाली होती. सगळीकडे फक्त कचर्‍याचं साम्राज्य होतं. जिथे पहावं तिथे फक्त कचर्‍याचे ढीग साचलेले दिसायचे. पण आज ही टेकडी हिरवीगार दिसते. कधीकाळी या टेकडीवर कचर्‍याचं साम्राज्य होतं यावर सांगूनही कोणाचा विश्‍वास बसणार नाही इतकं तिचं रुपडं पालटलं आहे. 13 वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे 2006 पर्यंत तुकाई टेकडी परिसरात नाक बंद करूनच यावं लागायचं. इथल्या 200 एकर परिसरात खूप दुर्गंधी येत असे. पण 2006 मध्ये इथल्या काही नागरिकांनी टेकडीच्या स्वच्छता मोहीम हाती घेतली. ‘वसुंधरा अभियान’ या नावाने मोहीम सुरू करण्यात आली. 15 वर्षांत इथे तब्बल 21 हजार झाडं लावण्यात आली. त्यावेळी 15 लोकांनी टेकडीच्या सौंदर्यीकरणाची मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर या मोहिमेशी अनेक जण जोडले गेले. पंधरा लोकांच्या तीस हातांना बळ मिळत गेलं आणि ही संख्या पाच हजारच्या घरात पोहोचली. विशेष म्हणजे या गटाचा कोणीही प्रमुख नाही. सर्व जण स्वयंस्फूर्तीने एकत्र आले आहेत. हे सर्व लोक मानवी साखळी तयार करून टेकडी आणि इथल्या झाडांची देखभाल करतात. टेकडीवरून पावसाचं पाणी वाहून जाऊ नये म्हणून ती सपाट करण्यात आली. त्यानंतर इथे झाडांची लागवड करण्यात आली. परिसर स्वच्छ राहावा, इथली हिरवळ टिकून राहावी यासाठी अनेक जण सकाळ-संध्याकाळ श्रमदान करतात. एकीचं बळ काय असतं हे यावरून आपल्या लक्षात येईल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा