पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीच्या प्रयत्नात असणारी टोळी जेरबंद

श्रीगोंदा – कोठे तरी दरोडा टाकण्याच्या तयारीने निघालेली टोळी श्रीगोंदा पोलीसांच्या सतर्कतेमुळे शस्त्रासह काही घातपात घडायच्या अगोदरच जेरबंद करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.28) पहाटे 3 च्या सुमारास बनपिंप्री गावाच्या शिवारात घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा पोलीस रात्री पेट्रोलिंग गस्त करत असताना बनपिंप्री गावच्या शिवारात हॉटेल सुप्रिम जवळ नगर- सोलापुर हायवेलगत असलेल्या अंधारात काही इसम संशयास्पद हालाचाली करत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. पोलीसांनी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून टेहाळणी केली व योग्य वेळ येताच त्यांच्यावर छापा टाकून त्यांना जेरबंद केले.

त्यावेळी त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे प्रफुल्ल विरेंद्र ससाणे (वय 21, रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड), शुभम संजय गायकवाड (वय 19, रा. मिरजगाव, ता. कर्जत, जि. अ.नगर), अमोल शाहुराव ससाणे (वय 36, रा. भिमवाडी, मिरजगाव, ता. कर्जत) असल्याचे समजले. यावेळी अंधाराचा फायदा घेत त्यांच्या समवेत असलेले दोघे जण फरार झाले. यात दीपक सुरेश गायकवाड (रा. कामठी, ता. श्रीगोंदा) व नान्या रहिमन्या भोसले (रा. गोसावीवाडी, ता. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे.

पोलीसांनी त्यांची कसुन चौकशी केली असता व झडती घेतली असता त्यांच्याजवळ मोटारसायकल व विवो कंपनीचा मोबाईल, कोयता, दोरी असे दरोडा टाकण्याचे साहित्य आढळुन आले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीसांनी पो.कॉ. संभाजी वाबळे यांच्या फिर्यादीवरून भादंविक 399, 402 प्रमाणे दरोड्याची तयारी करण्याच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बोडखे हे करीत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा