रक्तदान शिबिरात युवकांनी सहभाग घ्यावा-आशिष रंगा

अहमदनगर- रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नसल्याने त्याची खरी किंमत वेळेला कळत असते. जरुरी असतांना जर आपण रक्तदान केले तर त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचू शकतात. यासाठी प्रत्येकाने रक्तदान करणे जरुरी आहे. युवक वर्ग सध्या विविध सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. त्यांनी आता रक्तदान शिबीरातही मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. यासाठीच श्री सिद्धीविनायक मित्रमंडळाच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करुन युवकांपुढे आदर्श ठेवण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष आशिष रंगा यांनी केले

तोफखाना येथील श्री सिद्धीविनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मित्र मंडळाच्यावतीने व अष्टविनायक ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आशिष रंगा, राहुल नराल, राहुल दुलम, संतोष रंगा, साईनाथ कोल्पेक, ऋषी रंगा, अभिषेक नल्ला, संकेत कोल्पेक, ओंकार दुलम, प्रेम रंगा, अक्षय रंगा, ओंकार ताटीपामुल, रोहन दुलम, शुभम बोडखे, प्रशांत रंगा, रवि मुनगेल, समर्थ नल्ला, शुभम कोल्पेक, अर्जुन दुडगु आदि उपस्थित होते.

याप्रसंगी ब्लड बँकेचे नरेंद्र मेरगु म्हणाले, रक्तदानामुळे गरजू रुग्णांना उपयोग होऊ शकतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रक्ताचे विघटन होत असल्याने वेगवेगळ्या पेशंटला आवश्यकतेनुसार रक्तघटक पुरविण्यात येतात. तसेच अपघात, आजाराचे प्रमाण वाढल्याने रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्ताची आवश्यकता आहे. तेव्हा युवकांनी अशा शिबीराच्या माध्यमातून रक्तदान करुन समाजाप्रती आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन केले.

या शिबीरात एकूण 40 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. रक्तसंकलनाचे कार्य पीआरओ संदीप पाटोळे, वरलक्ष्मी श्रीपत, गोरख बोडखे, महेश करांडे आदींनी केले. शिबीरासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.