कोणी शिंकले, खोकले, ताप आला की ‘फ्ल्यू’ झाला असेल, असा सरसकट निष्कर्ष काढला जातो; पण तो खरोखर फ्ल्यू नसतोच. फ्ल्यू म्हणजे इल्फ्लूएंझा हा भयंकर रोग. इल्फ्लूएंझा विषाणूंमुळे होतो. या विषाणूंचे तीन प्रकार असतात. दर काही वर्षांनी या रोगाच्या साथी येतात व त्या जगभर पसरतात. 1918-19 मध्ये या रोगाने 2 कोटींहून जास्त लोकांचे बळी घेतले. याच काळात भारतात 60 लाख लोक मृत्यूमुखी पडले.
विषाणूच्या संरचनेत सदोदीत होणार्या बदलांमुळे या विषाणूसाठी प्रतिबंधक लस तयार करता येत नाही वा केलीच तर ती फार काळ उपयुक्त ठरत नाही. या रोगात थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे व खोकला अशी लक्षणे दिसतात. न्यूमोनिया नावाच्या भयानक गुंतागुंतीमुळे अनेकजण मृत्यूमुखी पडतात. या विषाणूवर औषधे उपलब्ध नाहीत व जी आहेत ती प्रभावी नाहीत. लस उपलब्ध आहेत, पण त्या वापरात येण्यापूर्वीच बर्याचदा बर्याच जणांना हा रोग झालेला असतो. श्वसनाच्या मार्गाने हा रोग एकापासून दुसर्याला होतो.
इन्फ्लूएंझाचा प्रतिबंध करण्याच्या उपायांना आजवर फार मर्यादित यश मिळाले आहे. लसीकरण हे सर्वांत प्रभावी शस्त्र असले, तरी प्रत्यक्षात त्याचा परिणामकारक उपयोग करण्यातच अडचणी येतात. त्यामुळे साथीच्या काळात घरातील वायूवीजन चांगले राखणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, रुग्णांना रुमालाने चेहरा झाकण्यास सांगणे व घराबाहेर न पडण्याचा सल्ला देणे; हे उपायच करावे लागतात. असा हा महाभयंकर एन्फ्लूएंझा. तुम्ही ज्याला चुकून फ्ल्यू म्हणता ते असते साधे सर्दी-पडसे. उपचार घेतल्यास आठवड्यात व न घेतल्यास सात दिवसांत बरे होते ते!