नियोजनाअभावी शहरात ऐन हिवाळ्यातही पाणीप्रश्‍न गंभीर

भाजपाच्या नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा

अहमदनगर- शहराच्या अनेक भागात केवळ नियोजनाअभावी कृत्रीम पाणीटंचाई जाणवत असून ऐन हिवाळ्यातच पाणीप्रश्‍न गंभीर झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकानेच महापौर कार्यालयात उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

भाजपाचे केडगाव येथील नगरसेवक मनोज कोतकर, सुरज शेळके यांनी शनिवारी (दि.16) दुपारी महापालिकेत येवून महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेतली. त्यांना कायनेटिक चौक परिसरातील रविश कॉलनी, सारसकॉलनी, आव्हाड विटभट्टी, प्रियंका कॉलनी, सुभद्रा नगर, धनश्री कॉलनी या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याबाबतची माहिती दिली. या भागाच्या पाणीप्रश्‍नासंदर्भात यावेळी अनेकदा पाठपुरावा केला आहे. सर्वसाधारण सभेतही यावर आवाज उठविण्यात आला होता. त्यावेळी महापौर वाकळे यांनीच अधिकार्‍यांना या भागाचा पाणीप्रश्‍न सोडविण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र तरीही हा प्रश्‍न न सुटल्याने ऐन हिवाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हिवाळ्यात ही परिस्थिती तर उन्हाळ्यात काय अवस्था असेल? याची कल्पना करवत नाही. महापालिकेचे अधिकारी नगरसेवकांनी सांगितलेली कामे करीत नसतील तर नगरसेवकांनाही आता आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल. येत्या आठ दिवसात या भागाचा पाणीप्रश्‍न सुटला नाही तर सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असुनही महापौर कार्यालयात उपोषण सुरु करु असा इशारा यावेळी नगरसेवक मनोज कोतकर यांनी दिला.

प्रश्‍नाचे गांभीर्य पाहून महापौर वाकळे यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना बोलावून घेत आजच या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी तसेच येत्या आठ दिवसात पाणीप्रश्‍न मार्गी लावावा अशा सुचना दिल्या.