चांगली वसुली केल्यास सत्कार करू, मात्र टंगळ मंगळ केल्यास कारवाई

महापौर बाबासाहेब वाकळे यांचा महापालिकेच्या वसुली कर्मचार्‍यांना इशारा

अहमदनगर – महानगरपालिकेच्या वसुली विभागातील जे कर्मचारी आपल्या प्रभागातील मालमत्तांपैकी जास्तीतजास्त 90 टक्क्यांपर्यत वसुली करतील त्यांचा महापालिकेतर्फे सत्कार करून रोख बक्षिसे देण्यात येतील. मात्र जे कर्मचारी टंगळ मंगळ करीत 50 टक्क्यांपर्यत वसुली करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला आहे.

महापालिकेच्या शहर वसुली व सावेडी वसुली विभागाची बैठक महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शुक्रवारी (दि.14) दुपारी घेतली. यावेळी उपमहापौर सौ.मालनताई ढोणे, उपायुक्त सुनिल पवार, माजी नगरसेवक नितीन शेलार, सुरज शळके, प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, अंबादास सोनवणे, कर निरिक्षक संजय उमाप, शाम गोडळकर, वसुली विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले की, शहर वसुली विभागात 14 कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु वसुलीचे प्रमाण 18 ते 20 टक्के पर्यत असून अत्यंत कमी प्रमाणात आहे. प्रत्येक कर्मचार्‍याने 50 टक्क्यांपर्यत वसुली येत्या 15 दिवसामध्ये नागरिकांना बिले देवून केली गेली पाहिजे. ज्या मालमत्ता वादग्रस्त आहेत. त्या मालमत्ता धारकांना नोटीसा देवून अगर मालमत्तेवर नोटीसा चिकटवून शेजारी राहणार्‍या नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात याव्यात. ज्या कर्मचार्‍यांची वसुली 50 टक्के होणार नाही त्यांना लेखी नोटीस देवून त्यांच्यावर उपायुक्त यांनी तातडीने कार्यवाही करावी. सावेडी वसुली विभागामध्ये आजून काही मालमत्तेचे नोंदी झालेल्या नाहीत त्या नोंदी करण्याबाबत प्रभाग अधिकारी व कर निरिक्षक यांनी दखल घ्यावी. प्रभाग अधिकारी यांनी वसुली वाढविण्याच्या दृष्टिने वसुली लिपीक यांचा दररोज आढावा घेण्यात यावा. दररोजच्या वसुलीची माहिती दररोज कार्यालयात देण्यात यावी. वसुली विभागामध्ये प्रत्येक झोनसाठी कर्मचारी वाढविण्यात यावेत. जास्तीत जास्त 90 टक्क्यापर्यत वसुली झाली तर प्रत्येक कर्मचार्‍याचा सत्कार करण्यात येईल व त्या कर्मचार्‍यांना रोख स्वरूपात बक्षिसे व वेतनवाढ देण्यात यईल. असेही यावेळी महापौर वाकळे यांनी जाहीर केले. पुढील बैठक 1 जुलै रोजी घेवून त्यात याबाबत आढावा घेतला जाणार आहे.

मालमत्ता धारकांना बिले मिळाले नसल्याच्या तक्रारी

यावेळी उपमहापौर सौ. मालनताई ढोणे यांनी सांगितले की, शहर वसुली व सावेडी वसुली विभागामध्ये कर्मचार्‍यांनी ऑफिसमध्ये दुपारच्या सत्रामध्ये हजर रहावे. जेणेकरून नागरिक पैसे भरावयाला आल्यानंतर त्रास होणार नाही. घरपट्टी वसुलीची बिले काही नागरिकांना वेळेवर मिळत नाहीत अशाही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्याची दखल प्रभाग अधिकारी यांनी घेवून सर्व मालमत्ता धारकांना बिले पोहोच होतील याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा