गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे प्रभाग 14 मधील सामाजिक स्वास्थ्य बिघडले

नागरिकांची तक्रार; पोलिसचौकी सुरु करण्याची मागणी

अहमदनगर – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील बुरुडगाव रोड परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले असून या परिसराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. या परिसरात तातडीने पोलिस चौकी सुरु करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी पोलिस अधिकार्‍यांकडे केली आहे.

याबाबत अप्पर पोलिस अधीक्षक अजय पाटील यांची नागरिकांनी भेट घेऊन निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा असून तो त्वरीत सखोल चौकशी करुन रद्द करण्यात यावा कारण या भागात काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वास्तव्यास असून त्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणेही केली आहेत. विज आणि पाणी कनेक्शन अनाधिकृतपणे घेतले आहेत. रात्रभर हे लोक मोठ्या आवाजात स्पिकर लावून, दारु पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालतात. उघड्यावरच मांसाहार करतात, दिवसभर टेहाळणी करुन रात्रीच्यावेळी चोर्‍या करतात, या लोकांची वस्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने या परिसराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यामुळे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना येथून हद्दपार करण्यात यावे तसेच या भागात कायमस्वरुपी पोलिस चौकी सुरु करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर परिसरातील 100 पेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.