पांडवकालीन श्री देव विमलेश्वर मंदिर

निसर्गसंपन्न कोकणच्या देवभूमीत विविध कलाविष्कारांनी युक्त अशी मंदिरं असणं, हे या भूमीचं विशेष वैशिष्ट्यं आहे. देवगडपासून साधारण १५ कि.मी. अंतरावर ‘वाडे’ हे डोंगराच्या कुशीत, वनराईत वसलेलं एक समृद्ध गाव. हे गाव पूर्वी अडकित्त्यांसाठी विशेष प्रसिद्ध होतं. तसंच भारतीय संस्कृती कोशाचे जनक पंडित महादेवशास्त्री जोशी, कथा-कादंबरीकार श्रीपाद काळे व अभिनेत्री पल्लवी जोशी यांचं हे मूळ गाव होय. इथून पुढे १५ कि.मी. अंतरावर शिवरायांचा ऐतिहासिक जलदुर्ग व श्री रामेश्वर मंदिर असून, या गावचं खास आकर्षण व भूषण म्हणजे इथलं पांडवकालीन शंकराचं देवस्थान अर्थात श्री देव विमलेश्वर मंदिर होय!

प्राचीन शिल्पकलेचा नमुना असलेलं हे मंदिर तिथे असलेल्या कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या सभोवती दाट वनराई व आकाशाकडे झेपावणारे उंचच उंच माड, पोफळी आदी झाडं आहेत. परिणामी वनराईत कमालीची शांतता व शितलता जाणवते. अलीकडच्या काळात तर या परिसरात चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या अखंड कातळात कोरलेल्या कलाकृतीतून हे मंदिर साकारलं असून, मंदिराच्या वरून वाहतुकीचा मार्ग जात असल्याने मंदिराच्या सभोवतीचा कडा सुमारे तीन फूट खोदून चर काढलेला आहे.

कळसाचं बांधकाम सिमेंटनं उंच बांधून वाढवण्यात आलं आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन हत्ती कोरलेले असून, त्यांच्या शेजारी दीपमाळा आहेत. प्रवेशद्वारावर मानवी रूपातली पाच कोरीव शिल्प असून, या शिल्पांना पंचतत्त्वांची प्रतीकं मानलं जातं. पांडव अज्ञातवासात असताना, त्यांनी एका रात्रीत या मंदिराची निर्मिती केली व पहाटेचा कोंबडा आरवताच ते निघून गेले, अशी या मंदिराविषयीची आख्यायिका आजही प्रचलित आहे. यावर संशोधन होणं गरजेचं असल्यानं त्यावरून या मंदिराच्या निर्मितीवर प्रकाश टाकता येईल. अर्थात मंदिराची शिल्पकलाकृती मात्र मानवी कलाविष्काराचं दर्शन घडवते. मंदिराच्या पाय-या चढताच एक भलीमोठी घंटा टांगलेली दिसते. पुढे जाताच ३५ बाय ३० बाय १२ फूट क्षेत्रफळ असलेला एक चौक लागतो. मंदिरात अंधार असल्याने भरपूर वटवाघळांचा वावर मात्र असतो. त्यांच्या चित्कारानं थोडं दचकायला होतं. तिथून काही पाय-या चढल्यावर मंदिराचा गाभारा लागतो. मध्यभागी सुबक आकारातली शंकराची पिंड व नंदीची मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेते. इथे नंदीकडून कौल घेण्याचं काम चालतं. गाभा-यात उंचावर असलेलं शिवलिंग म्हणजे भारतातलं एक दुर्मिळ वैशिष्ट्य! मानवी कल्पकता व निसर्ग यांचा सुंदर मिलाप असलेलं प्राचीन मंदिर आजही आहे त्याच स्थितीत टिकून आहे. मंदिराच्या समोरच एक ओढा असून, त्याला बारमाही पाणी असतं. तिथे दोन झरेही वाहताना दिसतात. पावसाळ्यात या ओढ्याचं पाणी गढूळ होत असले, तरी झ-याचं पाणी मात्र स्वच्छ असल्यानं ते गंगेचं पाणी मानलं जातं.

दरम्यानच्या काळात लेण्यांच्या दगडातून सफेद गोंदासारखा द्रव पाझरतो, त्यास स्थानिक ग्रामीण बोलीभाषेत ‘पाषाण’ असं म्हणतात. या द्रवाचा उपयोग ‘दमा’ या आजारावर केला जातो.

मंदिरासमोर सभामंडप व बसण्यासाठी कठडा, दोन्ही बाजूला प्रदक्षिणेसाठी चि-यांनी घाट्या बांधून काढल्या आहेत. शेजारी मोठं तुळशी वृंदावन, काळभैरव व गणेश मंदिर असून, धर्मशाळा व नेने सत्पुरुषाचं समाधीस्थळही आहे. मंदिरात होणारा मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्रीचा! यावेळी मंदिरात सभामंडप उभारून छत, झालरी, पताका लावून सर्वत्र विद्युत रोषणाई केली जाते. माघ कृष्ण दशमी ते अमावास्येपर्यंत हा उत्सव असतो. एकादशीला जत्रा भरते. त्या दिवशी ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचे तरंग मंदिरात आणले जातात. नंतर मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा घातली जाते. दरम्यान, मंदिरात रोज आरती, कीर्तन, प्रवचन व भजनं होतात. चाकरमान्यांच्या आगमनामुळे गावातल्या उत्साहाला अधिकच उधाण आलेलं असतं.

अमावास्येच्या दिवशी सकाळी पालखीसह लोक समुद्रस्नानासाठी जवळ असलेल्या फणसे इथल्या समुद्रकिनारी जातात. रात्री लळिताच्या कार्यक्रमानं उत्सवाची सांगता होते. धार्मिक पर्यटनाचा लाभ घेणा-यांनी श्री कुणकेश्वर, श्री विमलेश्वर व श्री रामेश्वर या सागरी क्षेत्राजवळ असलेल्या देवस्थानांच्या दर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा. या मंदिरास पर्यटकांसह अनेक शाळकरी मुलंही भेट देतात, पण शासकीय उदासिनतेमुळे इथे पर्यटनदृष्ट्या या स्थळाचा विशेष असा विकास मात्र झाल्याचं दिसत नाही. परंतु इथला नयनरम्य परिसर आणि पांडवकालीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या श्री देव विमलेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाचं हे मंदिर एक कायमचं श्रद्धास्थान बनून जातं, यात मात्र शंका नाही.