ज्येष्ठांसाठी आरोग्य विमा घेताना…..

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा घेताना काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. कंपन्यांच्या भूलथापांना बळी न पडता, अचूक पॉलिसीची निवड करताना आपले कौशल्य पणाला लागते.

चांगल्या आरोग्यामुळे विमा उतरवला नसेल: तरुणपणाच्या काळात बहुतांश मंडळी आरोग्य विम्याकडे लक्ष देत नाहीत. कारण संस्थेकडून किंवा कंपनीकडून आरोग्य विम्याची सुविधा दिली जाते. मात्र निवृत्तीनंतर हेल्थ इन्शूरन्सचे कवच संपुष्टात येते. अशावेळी विम्याची खरी गरज भासत असते. म्हणूनच इर्डा संस्थेने विमा कंपन्यांना वयाच्या 65 पर्यंत आरोग्य विमा काढण्याची मूभा द्यावी, अशी सूचना दिली आहे. या आदेशानुसार जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकास आरोग्य विमा देण्यास नकार दिला जात असेल तर त्याला नकाराचे कारण लिखित स्वरुपात द्यावे लागणार आहे याशिवाय कोणतीही विमा कंपनी ज्येष्ठ असल्याच्या कारणावरुन विमा देण्यास नकार देऊ शकत नाही. यात ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या टीपीएसमध्ये बदल करण्याची मूभा दिली आहे.

योग्य पर्याय निवडा : आरोग्य विमा उद्योगात प्रत्येक विमा कंपन्यांची ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारी पॉलिसी सारखीच असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा पॉलिसी करताना सहा गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.

विमा कवच : आपण जेवढे अधिक कवच घ्याल, त्याप्रमाणात विमाधारकांचा फायदा होईल. अर्थात त्याचा थेट संबंध हा विमा हप्त्याशी असतो. काही कंपन्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर किंवा भरती होण्यापूर्वी खर्चाव्यतिरिक्त आणखी काही सुविधाही प्रदान करतात. या कंपन्या कन्झ्यूमेबल अलाऊन्स, अलॉऊन्स फॉर कंम्पेनियन, डोमिसिलियरी हॉस्पिटलायजेशन, डायलिसीसला देखील कवच देते. त्यामुळे अधिकाधिक कवच कसे मिळेल, याचा विचार करायला हवा.

पूरक विमा : काही पॉलिसीत आपल्याला मूळ एसआयच्या शंभर टक्के निधीपर्यंतच्या विमा रक्कमेला रीचार्ज करण्याचा पर्याय मिळतो. काही कंपन्या आपल्याला एक ते तीन वर्षाच्या काळासाठी पॉलिसी देते. मात्र आपल्याला परवडणारी आणि पूरक ठरणारी विमा योजना निवडावी. ज्येष्ठांसाठीच्या काही पॉलिसीत पेमेंटबाबत काही नियम असतात. दाव्यातील काही रक्कम पॉलिसीधारकाने भरण्यास सांगितले जाते. इर्डाच्या मते, प्रि-इन्शूरन्स मेडिकल तपासणीच्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम ही ज्येष्ठ नागरिकांना परत दिली जाते. शेवटी चांगली डिल करणार्‍या पॉलिसीची निवड करावी.

नुतनीकरणासाठी कमाल वय : प्रत्येक कंपनीचे नियम वेगळे असतात. मात्र काही कंपन्या लाइफ लॉंग रिन्यूअलचा पर्याय देखील देतात. त्यामुळेच पॉलिसी घेताना तो पर्याय निवडावा.

पूर्वीचे आजारपण किंवा वेटिंग पीरियड : अनेक कंपन्या सध्याच्या आजारपणासाठी एक वेटिंग पीरियड निश्‍चित करते. या कालावधीत त्या आजारपणाला कवच दिले जात नाही. त्यासाठी जेवढे कमी वेटिंग पीरियड असेल, तेवढे चांगले असते. जर आपल्याला पूर्वीपासूनच एखादा आजार असेल तर पॉलिसीच्या वेटिंग पीरियडनंतरच त्याला कवच दिले जाईल.

दाव्याची प्रक्रिया : कोणत्याही वयात दाव्याची प्रक्रिया ही सुलभ आणि सुटसुटीत असणे गरजेचे आहे. पॉलिसी काढण्यापूर्वी दाव्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. परिणामी दाव्यासाठी अधिक वेळ जाणार नाही किंवा वारंवार त्याचा फॉलोअप घेण्याची गरज भासणार नाही.