वाहनांची विक्री निचांकी पातळीवर

रिअल इस्टेटप्रमाणेच वाहन उद्योगही सध्या मंदीतून जात आहे. चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी निर्मात्यांकडून विविध ऑफर आणि सवलतींचा मारा केला जात असला तरी ग्राहकांची उदासिनता कायम आहे. गाड्यांच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती यामागे प्रमुख कारण सांगितले जात आहे. असे असले तरी कंपनीकडून काही प्रमाणात ऑफर दिली जात असली तरी ग्राहकांनी काही प्रमाणात पाठ फिरवली आहे. त्यामुळे वाहन उद्योगातील संकट अधिकच गडद होत चालले आहे.

गाड्यांच्या मागणीत घट होऊ लागल्याने जुलै महिन्यात वाहनांच्या विक्रीचा 19 वर्षातील निचांक नोंदविला गेला आहे. वाहन निर्मात्यांची संघटना सियामच्या मते, देशात एकूण वाहनविक्री जुलै महिन्यात 18.71 टक्क्यांनी घसरुन वाहन विक्रीची संख्या ही 18,25,148 इतकी राहिली. मागील वर्षीच्या जुलै महिन्यांत 22,45,223 वाहनांची विक्री झाली होती. डिसेंबर 2000 नंतरची ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. त्यावेळी 21.81 टक्के घसरण नोंदली गेली होती.

सलग नवव्या महिन्यात घसरण

प्रवासी वाहनांच्या घरगुती विक्रीत जुलैमध्ये 19 वर्षातील सर्वाधिक घसरण दिसून आली. घसरणीचा हा सलग नववा महिना आहे. प्रवासी वाहनांची विक्री 30.98 टक्क्यांने घसरल्याने एकूण वाहन विक्री 2,00,790 एवढी राहिली. ही संख्या गेल्यावर्षी जुलै महिन्यात 2,90,931 राहिली होती. यापूर्वी 2000 मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत 35.22 टक्के घसरण नोंदली गेली होती. आगामी काळातही विक्री वाढण्याची शक्यता नाही.

मोटारसायकलच्या मागणीत घसरण

मोटारसायकलच्या मागणीत सतत घट होत चालली आहे. जुलै महिन्यात मोटारसायकलची घरगुती बाजारात 9,33,996 विक्री झाली होती. गेल्यावर्षी याच कालावधीत 11,51,324 दुचाकी गाड्या विकल्या गेल्या होत्या. जुलै 2018 मध्ये हा आकडा 16.82 टक्के अधिक म्हणजेच 18,17,406 एवढा राहिला.

15 हजार जणांच्या नोकर्‍या गेल्या

सियामच्या अहवालानुसार वाहन निर्मिती कंपन्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यात सुमारे 15 हजार जणांना कामावरून कमी केले. यात बहुतांश नोकर्‍या हा कंत्राटी कामगार किंवा अस्थायी कर्मचार्‍यांच्या होत्या. सियामचे महासंचालक विष्णू माथुर यांच्या मते, वाहन उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून तात्काळ दिलासा देण्याची गरज आहे. याबाबत जर लवकरच घोषणा केली गेली नाही तर संकट अधिकच गडद होईल. वाहन उद्योग हा व्यवसाय वाढण्यासाठी उपाय करत आहे. त्याचेवळी सरकारने देखील मदत करणे अपेक्षित आहे, असे माथुर यांनी म्हटले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा