वारकरी सेवेचे सत्कर्म आमच्या हातून कायम घडावे – शैलेश मुनोत

अहमदनगर- भक्ताच्या भेटीसाठी अठ्ठावीस युगापासून वीटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला लाखोंचा जनसमुदाय पंढरपूरला जात असतो. आषाढी वारीची ही शतकानुशतके सुरु असलेली परंपरा महाराष्ट्राचे अध्यात्मिक वैभव आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता वारकरी पंढरीकडे मार्गक्रमण करतात. काट्याकुट्याची वाट तुडवताना होणारे श्रम, पायाला होणार्‍या वेदना विसरून ते भक्तीत तल्लीत झालेले असतात. विठ्ठलाच्या नामस्मरणात देहभान विसरून, वेदना बाजूला ठेवून मार्गक्रमण करणार्‍या वारकर्‍यांची सेवा करताना साक्षात पांडुरंगाचरणी सेवा अर्पण केल्याचा आनंद मिळतो. गौरव फिरोदिया व फिरोदिया परिवाराच्या माध्यमातून ही सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते. सेवा हाच खरा मानवधर्म असून, असे सत्कर्म आमच्या हातून कायम होत राहो, अशा भावना जय आनंद महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष शैलश मुनोत यांनी केले.

आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पायी दिंडीने लाखो वारकरी सध्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत आहे. श्रीक्षेत्र शिर्डीतील साईबाबा संस्थानचा पालखी सोहळाही पंढरीला जाताना नगरमध्ये विसावला असता जय आनंद महावीर युवक मंडळाने वारकर्‍यांच्या चपलांची दुरुस्ती करून देत त्यांची अनोखी सेवा केली. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाचे कार्यकर्ते हा उपक्रम राबवत आहेत. यंदाही वारकर्‍यांचे स्वागत करताना त्यांच्या चपला, बुट दुरुस्त करून देण्याची व्यवस्था मंडळाने केली. चर्मकार बंधू सुनील गारदे यांनी यासाठी मदत केली. प्रत्येक वारकर्‍याची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत मंडळाच्या सदस्यांनी त्यांच्या चपला दुरुस्त करून दिल्या. दगडमाती, काट्याकुट्याची, चिखलाची वाट तुडवताना नादुरुस्त चप्पल, बुटांमुळे होणारा त्रास या उपक्रमातून कमी होत असल्याने वारकर्‍यांनी मंडळाच्या सदस्यांना मनापासून आशिर्वाद दिले.

साईबाबा संस्थानच्या दिंडी सोहळ्याचे प्रमुख काशिकानंद महाराज यांचे स्वागत व सत्कार कल्पतरु उद्योग समूहाचे गौरव फिरोदिया व कल्याणी फिरोदिया यांनी केले. अमोल तांबोळी यांच्या हस्ते पालखीतील पादुका पूजन व आरती करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, बाबालाल गांधी, सेक्रेटरी कुंतीलाल राका, मनोज गुंदेचा, सत्येन मुथा, राहुल सावदेकर, योगेश मुनोत, शरद मुथा, सचिन कोठारी, हेमंत मुथा, धरमचंद भंडारी, गणेश गुंदेचा, आनंद मुथा, संजय ओस्तवाल, अमित गांधी, विनोद भंडारी, सुरेश गांधी, अजय गांधी आदी उपस्थित होते.

गौरव फिरोदिया म्हणाले की, मानवसेवा हाच खरा धर्म असल्याची शिकवण आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी कायम दिली. त्यांच्या या आदर्श वचनांना जागून जय आनंद मंडळ दरवर्षी वारकर्‍यांचे स्वागत करताना त्यांच्या पायांना चालताना त्रास होवू नये यासाठी चप्पल, बुट दुरुस्त करून देण्याचा उपक्रम राबवत आहे. फाटलेली, जीर्ण झालेली चप्पल चालण्यायोग्य झाल्यावर वारकरी आनंदीत होवू मनापासून आर्शिवाद देतात. वारकर्‍यांमध्ये साक्षात पांडुरंगाचे दर्शन होत असल्याची अनुभूती प्रत्येकाला नक्कीच येत असेल.

काशिकानंदजी महाराज म्हणाले की, नगरची भूमी ही संतांची भूमी आहे. साईबाबांच्या पालखी सोहळ्याचे नगरकर दरवर्षी उत्साहात स्वागत करतात. सामाजिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असलेला फिरोदिया परिवार मनोभावे सर्व वारकर्‍यांचे आदरातिथ्य करून सेवा करतात. याचवेळी नवीपेठ येथील जय आनंद मंडळ दिंडीतील वारकर्‍यांच्या पादत्राणांची दुरुस्ती करून देत त्यांची वेगळ्या पध्दतीने काळजी घेते. साईबाबा, आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या महान शिकवणुकीचा संगम नवीपेठेत पहायला मिळतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा