शहरातील गटारी, रस्त्यांची अवघ्या दोन पावसातच लागली ‘वाट’

सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे, रस्त्यांना आले तळ्याचे स्वरुप

अहमदनगर- महापालिकेच्या पावसाळ्यापुर्वीच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरातील रस्त्यांची अवघ्या दोनच पावसात पुर्णत: दयनिय अवस्था झाली आहे. पावसात आणि पाऊस उघडल्यानंतरही मध्य शहरातील अनेक रस्त्यांवर पावसाच्या पाण्याची तळी साचल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांची पावसामुळे संपूर्ण वाट लागली असून नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे.

नगर शहरात गुरुवारी (दि.13) यंदाचा दुसरा मोठा पाऊस कोसळला. सुमारे तासभर पडलेल्या या पावसाने शहरातील रस्ते, गटारी, वीज वितरण व्यवस्था पूर्णत: कोलमडून पडली. अनेक रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. महापालिकेच्या जुने कार्यालय ते होशिंग हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून ते परिसरातील रहिवाश्यांच्या घरात घुसले. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सिद्धीबाग ते न्यू आर्टस् कॉलेज रस्त्याला तर तलावाचे स्वरुप आले असून शुक्रवारी (दि.14) दुपारपर्यंत या रस्त्यावर पाण्याचे तळे साठले होते. रस्त्यावरील पाण्याचा निचरा होऊ न शकल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत होता. सनमून बुक स्टॉल चौकात रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या रंगारगल्ली येथील कार्यालयासमोर मातीचे मोठे ढिगारे पडल्याने पावसाचे पाणी तुंबले. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून रस्त्याची दुर्दशा झाल्याने येथे पायी चालणेही अशक्यप्राय झाले आहे. जुन्या पाठक हॉस्पिटल समोर रस्त्याची तर दयनिय अवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावरील मोठ-मोठी खडी वर आली आहे. त्यामुळे पादचार्‍यांसह वाहनचालकांना येथून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.

स्टेट बँक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर पावसामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. रस्त्याने जाताना नाकाला रुमाल लावूनच नागरिकांना चालावे लागत आहे. त्याचबरोबर हा रस्ताही अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत.

शहरातीेल प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंजबाजार, सराफ बाजारातील रस्त्यांचीही पावसाने दयनिय अवस्था केली आहे. सर्वत्र खड्डे पडले असून वाहनचालक त्यामुळे त्रस्त झाले आहेत. कल्याणरोड परिसरातील रहिवाश्यांना तर घरी जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे, चिखल यामुळे मुख्य रस्त्यावरच गाड्या लावून नागरिकांना घरी जावे लागत आहे. शनि चौक, आशा टॉकीज चौक आणि रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहरातील रस्ते आणि गटारीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अवघ्या दोन पावसातच महापालिकेचे पावसाळी नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी अधिकार्‍यांनी पुर्वतयारी म्हणून कोणतेही नियोजन केले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे तेच रस्ते, तेच खड्डे, त्याच गटारी आणि तीच कामे त्यावर निधीची फक्त नव्याने तरतूद असाच प्रकार मागील वर्षानुवर्षे नागरिकांना सहन करावा लागणार यात शंका नाही.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा