यंदाच्या दिवाळीत नात्यांचा गोडवा घेऊन येतोय ’ट्रिपल सीट’

संपूर्ण चित्रीकरण नगरमध्ये झालेली अप्रतिम कलाकृती, निर्माते, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ आणि बहुतांश कलाकार नगरकर

नगर शहराला सुमारे साडे पाचशे वर्षांचा दैदीप्यमान ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आज राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही हे शहर अत्यंत महत्वपूर्ण आहे. अहमदनगर महाकरंडक स्पर्धेच्या एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून कलक्षेत्रात उतुंग भरारी घेतलेल्या कलाकरांनी आता आपला मोर्चा चित्रपट निर्मितीकडे वळविला आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी यांची निर्मिती असलेला व संकेत पावसे दिग्दर्शित ’ट्रिपल सीट’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

नगर येथील उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून सहनिर्माता स्वप्निल संजय मुनोत व सहाय्यक निर्माता पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. तर या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखक आणि क्रीएटिव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित दळवी यांनी केले आहे. ’आय लव्ह नगर’ या चळवळीतुन प्रेरणा घेत या चित्रपटाच्या निर्मिती टीमने स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ यांना संधी देण्याचे ठरवले होते. यामुळे ’ट्रिपल सीट’ या चित्रपटाचे मुख्य कलाकार वगळता निर्माते, लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार, ज्युनिअर कलाकार, तंत्रज्ञ, सर्व विभागातील सहाय्यक अशी 90 टक्क्याहून अधिक टीम ही अहमदनगरचीच आहे.

कला, साहित्य आणि मनोरंजन क्षेत्र आता पुणे, मुंबई शहरापर्यंत मर्यादित न राहता विस्तारत आहे. हा विस्तार होताना छोट्या शहरातील, गावातील कलाकार, तंत्रज्ञ मोठ्या शहरात जाऊन कार्यरत झाले असे अनेकदा दिसते. मात्र आपल्या शहरात या मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या आपल्या शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण व्हावी या भावनेतून ’अहमदनगर महाकरंडक’ स्पर्धेची सुरुवात अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंटच्या नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांच्या मदतीने झाली, आज ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आता नरेंद्र फिरोदिया आणि महाकरंडक आयोजनातील त्यांचे सर्व सहकारी ’ट्रिपल सीट’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येउन अहमदनगरच्या मातीतील चित्रपट घेऊन आले आहेत.

’ट्रिपल सीट’ या चित्रपटाची कथा कृष्णा, तन्वी आणि वृंदा यांच्या भोवती गुंफण्यात आलेली आहे. ’गोष्ट वायरलेस प्रेमाची’ अशी टॅगलाइन असलेला हा चित्रपट नात्यांमधील गोडवा विषद करतो. ’ट्रिपल सीट’ मध्ये अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, शिल्पा ठाकरे, राकेश बेदी, विद्याधर जोशी, वैभव मांगले, योगेश शिरसाट, स्वप्नील मुनोत, प्रकाश धोत्रे, अभिजीत झुंजारराव, प्रसाद बेडेकर, पूनम पाटील, शोभा दांडगे, राहुल नेवाळे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

प्रेम, कौटुंबिक जिव्हाळा आणि मैत्रीचे महत्व सांगणार्‍या ’ट्रिपल सीट’ या चित्रपटाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत लाभले आहे. अंकुशच्या शिवानी सोबतच्या नात्यातील जिव्हाळा व्यक्त करणारे ’नाते हे कोणते’ तसेच पल्लवी सोबतचे ’रोज वाटे’ या दोन्ही गीतांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पटकथेच्या हातात हात घालून जाणारी ही गाणी रसिकांच्या मनाला भिडणारी आहेत. गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत.

‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अहमदनगर शहरात करण्यात आले आहे. यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने अहमदनगरमधील अनेक ऐतिहासीक वारसा लाभलेल्या वास्तु पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला, नात्यातील गोडव्यावर हळुवार भाष्य करणारा ’ट्रिपल सीट’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत 25 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.