तिरूचनूरची पद्मावती देवी

तिरूचनूर हे तिरुपतीजवळील एक लहानसे गाव आहे. या छोट्याशा गावात देवी पद्मावतीचे सुंदर मंदिर आहे. पद्मावती देवी अतिशय दयाळू आहे. तिला शरण गेल्यास आपली सगळी पापे नष्ट होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रध्दा आहे. तिरुपती बालाजीच्या मंदिरात मागितलेली इच्छा पद्मावती देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतरच पूर्ण होते अशीही समजूत आहे. तिरुपतीपासून हे मंदिर अवघ्या पाच किलोमीटरवर आहे.

मंदिर परिसरात ब-याच देवी-देवतांची लहान लहान मंदिरे आहेत. देवी पद्मावतीव्यतिरिक्त कृष्ण-बलराम, सुंदरराजा स्वामी आणि सूर्यनारायण मंदिरेही आहेत, पण प्रभू व्यंकटेशांची पत्नी असल्यामुळे देवी पद्मावती मंदिराला जास्त महत्त्व. पद्मावती देवीची मूर्ती कमळाच्या आसनावर असून, तिच्या वरील दोन्ही हातांमध्ये कमळाचे पुष्प आहे.

तरूचनूर गावातील हे मंदिर प्राचीन असल्याचे मानले जाते. तिरुपतीतील वेंकटेश्वराचे मूळ मंदिर येथेच होते, असे सांगितले जाते, पण येथील जागा कमी पडू लागल्याने मंदिर तिरुपतीत स्थलांतरित करण्यात आले. दोन महत्त्वाचे पूजाविधी वगळता बाकीचे रिती-रिवाज तिरुपतीमध्येच पार पाडले जाऊ लागले. त्यामुळे तिरूचनूरचे महत्त्व थोडे उणावले. बाराव्या शतकात यादव राजांनी येथे कृष्ण-बलरामाचे सुंदर मंदिर बांधले. त्यामुळे या मंदिराला महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर येथे सोळाव्या आणि सतराव्या शतकात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. सुंदरा वरदराजाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि देवी पद्मावतीसाठी वेगळे मंदिर बांधण्यात आले. पौराणिक कथेनुसार देवी पद्मावतीचा जन्म कमळाच्या फुलात झालेला असल्यामुळे मंदिर तलावात बांधण्यात आले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा