निवडणूक कामासाठी नेमलेल्या शिक्षक कर्मचार्‍यांना सुविधा द्या अन्यथा कामावर बहिष्कार टाकणार

जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचा इशारा

अहमदनगर- निवडणूक कामासाठी नेमलेल्या शिक्षक कर्मचार्‍यांना सुविधा द्याव्या अन्यथा कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप थोरे यांना देण्यात आले.

यावेळी शिक्षक संघाचे सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, नगर शहराध्यक्ष उद्धव गुंड, मारुती लांडगे, प्रभाकर खणकर, एकनाथ जगताप, शिरीष टेकाडे, रोहिदास कांबळे, बद्रीनाथ शिंदे, रमाकांत दरेकर, श्रीकांत वाखारे, सीमा ठाकर, जयश्री माथेसूळ, संगीता शिंदे, सुवर्णा अकोलकर, प्रवीण साठे, गणेश उघडे आदींसह शिक्षक उपस्थित होते.

विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून, जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना निवडणुकीच्या कामकाजाविषयी तालुकास्तरावर प्रशिक्षणे चालू आहेत. परंतु या प्रशिक्षणादरम्यान तसेच निवडणुकीचे कामकाज करताना कर्मचार्‍यांना कुठलीही सुविधा पुरवली जात नाही. मागील लोकसभेच्या निवडणुकीत कर्मचार्‍यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. यावेळी तसे होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

महिला कर्मचार्‍यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून दिलेली नियुक्ती रद्द करून ज्याठिकाणी महिला सेवेत असतील त्याच ठिकाणी त्यांना नियुक्ती द्यावी, आजारी शिक्षक कर्मचार्‍यांची शाळा प्रमुखामार्फत चौकशी करून नियुक्ती रद्द करावी, इतर तालुक्यात नेमणूक दिल्यास येण्या-जाण्यासाठी वाहण्याची व्यवस्था करावी, मतदान व मतदारांची टक्केवारी वाढल्यामुळे बुथवर मतदान अधिकार्‍यांच्या संख्येत वाढ करावी, निवडणुकीच्या दिवशी बुथवर लाईट, पाणी, भोजन आदी भौतिक सुविधांची व्यवस्था करावी, कुठल्याही कर्मचार्‍याला दमबाजीची भाषा वापरू नये, प्रत्येक प्रशिक्षण रविवारी सुट्टीच्या दिवशी घेतल्यामुळे त्या दिवसाची विशेष रजा मिळावी, कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करावी, इतर जिल्ह्यांप्रमाणे कर्मचार्‍यांना दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली आहे.