जिल्हातंर्गत बदली धोरण व शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर प्रधान सचिव सकारात्मक – बाबासाहेब बोडखे

शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने घेतली प्रधान सचिवांची भेट

अहमदनगर- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने जिल्हातंर्गत बदली धोरण व विविध प्रश्ना् संदर्भात प्रधान सचिव (ग्रामविकास विभाग) असिम गुप्ता यांची मुंबई विधानभवनात भेट घेऊन चर्चा केली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय केळकर व राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भेट प्रसंगी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

असीम गुप्ता यांनी सध्या नवीन शिक्षक भरती पवित्र पोर्टल सुरू आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया टप्पा 3 थांबलेला आहे. पवित्र पोर्टल भरती प्रक्रिया संपल्या नंतर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये 10 टक्के पेक्षा कमी पदे रिक्त ठेऊन याद्या जाहीर करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकित 2017 साली आंतरजिल्हा बदली टप्पा एक मधील रायगड जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करणे, पती-पत्नी हे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत एकत्रीकरणासाठी कुठलीच अट ठेवू नये व शासननिर्णय 28 मे 2019 रद्द करावा, गडचिरोली सारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा अत्यावश्यक पायाभूत भौतिक सुविधा पासून वंचित आहेत तरी तेथे अत्यावश्यक भौतिक पायाभूत सुविधा पुरवण्यात याव्यात, तसेच मे 2018 व एप्रिल 2019 मधील जिल्हा अंतर्गत बदल्यातील रँडम राऊड मधील शिक्षकांसाठी 28 जून 2018 च्या शासन निर्णयनुसार नविन शिक्षक भरतीपूर्वी समानीकरणाच्या जागा उपलब्ध करून, समुपदेशन पद्धतीने बदल्या कराव्यात याबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत 28 मे 2019 शासन निर्णयानुसार समानिकरणाच्या शाळा खुल्या करण्यासंदर्भात कुठलाच उल्लेख केलेला नाही. मे 2018 व एप्रिल 2019 मध्ये जिल्हा अंतर्गत बदल्यामध्ये ज्या महिला शिक्षक भगिनींच्या रँडम राऊंड व विस्थापित होऊन ज्या गैरसोईच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांना सर्व प्रथम समानिकरणाच्या शाळा नवीन शिक्षक भरती पूर्वी अगोदर खुल्या करण्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, याबाबत अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

काही जिल्हा परिषदांनी रोस्टर रिक्त नसल्या बाबत कळवले नसल्याने जे शिक्षक अद्याप कार्यमुक्त झालेले नाहीत अशा शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे, सर्वच महिला शिक्षक भगिनींना सरसकट कुठलीच अट न ठेवता जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत संवर्ग 1 मध्ये अंतर्भूत करावे, सीमेवर देश रक्षणाचे कर्तव्य बजवाणारे आजी/माजी सैनिकांचे पत्नी असलेल्या शिक्षिकांना आंतरजिल्हा बदलीचा लाभ मिळावा, आंतरजिल्हा बदली टप्पा क्रं.3 च्या शिक्षकांच्या याद्या शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी जाहीर करून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्यावतीने कुठल्याच एकल शिक्षकांवर कसल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही याची पुरेपूर प्रामाणिकपणे दखल नक्कीच घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही झालेली बैठक फक्त शिक्षक बदल्या या एकमेव विषयाशी संबंधित नसून, शिक्षकांच्या सर्व न्याय्य हक्क मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे बोडखे यांनी सांगितले आहे. या बैठकीसाठी शिक्षक परिषदेचे राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा