नोकरदारांनो, करसवलत अशी मिळवा

वेतनदार वर्गातील बहुतांश मंडळी माहितीच्या अभावामुळे करसवलतीच्या अधिक लाभापासून वंचित राहतात. अर्थात दरवर्षी करसवलतीसाठी विविध ठिकाणी गुंतवणूक केली जाते. पीपीएफ, पोस्टाच्या योजना, इएलएसएस योजना, विमा योजना, आरोग्य विमा आदीत गुंतवणूक करून सवलत मिळवली जाते. याशिवाय गृहकर्ज असेल तर व्याजावरही करसवलत दिली जाते. याशिवाय आपल्याला वेतनातही समाविष्ट असलेल्या काही भत्त्यातूनही करसवलत मिळवता येते. या आधारावर नोकरदार मंडळी वेतनश्रेणीतील बदलाच्या आधारे आणखी बचत करु शकतात. यासाठी कंपनीच्या एचआर विभागाकडे अर्ज सादर करणे गरजेचे आहे. अर्जाच्या आधारे वेतनश्रेणीत अनेक भत्त्यांचा समावेश करता येतो. अर्थात भत्त्याच्या माध्यमातून करसवलतीचा लाभ मिळवताना कागदपत्रे सादर करावी लागतात.

घरभाडे भत्ता : हा घरभाड्यावर मिळणारा भत्ता आहे. भाड्याचा भत्ता हा मूळ वेतनाच्या 40 ते 50 टक्के असतो. हा भत्ता स्थानिक दरावर अवलंबून असतो. कर्मचारी भाड्याने राहत असेल तर करात सवलत मिळते.

औषधी बिलात सवलत : कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना आरोग्यावरील खर्चाच्या रुपाने भत्ता देते. हा भत्ता औषधाची पावती दिल्यावर मिळते. वार्षिक 15 हजारांपर्यंत बिलावर करसवलत मिळते. त्यामुळे औषधोपचारावर झालेल्या खर्चाची बिले कंपनीकडे सादर करून भत्ता मिळवावा आणि करसवलतीसाठी दावा करावा.

मोबाइल बिल भरणा : कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना मोबाईल बिलाचा भरणा करताना सवलतीची सुविधा प्रदान करते. यानुसार आपण मोबाईल, टेलिफोनच्या बिलावर सवलत मिळवू शकता.

सहलीचा खर्च : कंपनी कर्मचार्‍यांना फिरण्यासाठी काही भत्ता प्रदान करते. चार आर्थिक वर्षात दोन प्रवास करण्याची सवलत दिली जाते. या आधारावरही करसवलत मिळवता येते. यासाठी प्रवास खर्चाच्या पावत्या आवश्यक आहेत. कंपनीच्या निकषानुसार पावत्या सादर कराव्या लागतात.

शिक्षणावरील खर्चात सवलत : जर आपली कंपनी शैक्षणिक भत्ता देत असेल तर दरमहा 600 रुपये म्हणजेच वार्षिक 7200 रुपयांच्या सवलतीसाठी दावा करू शकता.

वाहतूक भत्ता : घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर ये-जा करण्यासाठी कंपनीकडून वाहतूक भत्ता दिला जातो. या आधारे वार्षिक 19,200 रुपयापर्यंत करसवलत मिळते.