नगर शहरातील डॉ. सुचित तांबोळी यांचा भारतातील सर्वोत्तम बालरोगतज्ञांमध्ये समावेश

अहमदनगर- नुकत्याच इंदोर येथे झालेल्या भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या अधिवेशनात ‘मेडगेट टुडे’ या मासिकाचे प्रकाशन झाले. ‘भारतातील सर्वोत्तम बालरोगतज्ञ’ असा मासिकाचा विषय होता. भारतातील सर्वोत्तम 25 बालरोगतज्ञांची वाटचाल व त्यांची माहिती या मासिकात प्रकाशित करण्यात आली आहे.

अहमदनगर येथील डॉ. सुचित तांबोळी यांचा वैकसित बाल मानसशास्त्रातील आद्य संशोधक आणि बौद्धिक विकास व वर्तन समस्या संबंधीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारा राष्ट्रीय पातळीवरील बालरोगतज्ञ असा सन्मान मासिकातर्फे करण्यात आला आहे.

ऊ त्या विषयातील आवड, परिश्रम व सततचे प्रयत्न हा यशाचा गुरुमंत्र आहे, असे त्यांनी सांगितले. हे मासिक विमानतळ, दूतावास, आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉस्पिटल्स व डॉक्टर्स यांच्याकडे वितरीत होते.

डॉ. तांबोळी यांनी भारतातील मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी सूचना देतांना, गर्भातील वाढ योग्य प्रमाणात असणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी 16 वर्षाच्या मुलीचे वजन कमीत कमी 45 किलो असावे तसेच बाळंतपणात 9 ते 11 किलो वजन वाढले तर जन्माला येणारे बाळ 3 किलोचे असू शकते त्यामुळे बरेचसे प्रश्न सुटू शकतात. लसीकरण 70% वरून 95% वरती नेणे आवश्यक आहे. बालदम्यासारखे प्रश्न प्रदूषण कमी करण्याने आणि पालक साक्षरता वाढवल्याने नियंत्रणात येतील असा विश्वास व्यक्त केला. पौगंडावस्थेतील मुलांना अभ्यास कौशल्य, जीवन कौशल्य, लैंगिक प्रशिक्षण व करियर मार्गदर्शन आवश्यक आहे. लवकर हस्तक्षेप उपचार पध्दती तालुका व ग्रामपंचायत पातळीवर राबवणे आवश्यक आहे.

इंदोर येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात मुलांच्या वर्तन समस्या बालरोगतज्ञांनी कशा हाताळाव्यात यावर डॉ. तांबोळी यांचे डिजिटल IAP अंतर्गत स्टुडीओ रेकॉर्डिंग झाले जे 30,000 बालरोगतज्ञांना शिकविण्यासाठी उपलब्ध असेल.

डॉ. तांबोळी यांनी तीन वर्षाच्या आतील कोणत्या अस्थिरतेचे रुपांतर लक्ष केंद्रित करण्याच्या आजारामध्ये मोठेपणी होते हे सांगतांना ‘तीव्र प्रतिबंधित पुनरावृत्ती वर्तन आणि कमी अनुकूलन कौशल्ये अतिसक्रियता आणि आवेगात्मक लक्षणांच्या तीव्रतेचा अंदाज करते’ असा सिद्धांत मांडला.

डॉ. तांबोळी यांनी मेंदूची वाढ गर्भावस्थेपासून पहिल्या 1000 दिवसांपर्यंत अत्यंत महत्वाची असल्याचे सांगून वयानुसार योग्य ती खेळणी, आहार, वातावरण व पालकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. बालरोगतज्ञांनी शारीरिक लसीकरणाबरोबर भावनिक लसीकरण करून मुलांच्या बौद्धिक वाढीस पालकांना मदत करावी असे सांगितले.