अतिरिक्त कामकाजामुळे तलाठी व्यस्त तर कामे खोळंबल्याने नागरिक त्रस्त

नगर जिल्ह्यात तलाठ्यांचा मोठा तुटवडा; तब्बल 103 जागा आहेत रिक्त

अहमदनगर- नगर जिल्ह्यात तलाठ्यांच्या तब्बल 103 जागा आहेत, त्यामुळे सध्या जिल्ह्यात तलाठ्यांचा मोठा तुटवडा जाणवत असून जे तलाठी कार्यरत आहेत, त्यांच्याकडे एका पेक्षा अधिक तलाठी कार्यालयांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या अतिरिक्त कामकाजामुळे तलाठी ’भाऊसाहेब’ प्रचंड व्यस्त राहत असल्याने दैनदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत असून अनेक कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे कामे खोळंबल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून प्रशासनाच्या लालफितीच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

महसूल व्यवस्था व गावपातळीवरील व्यवस्था यांना जोडणारा महत्वपूर्ण प्रशासकीय घटक म्हणजे तलाठी. तलाठी कर्मचारी हे महसूल विभागाचे मूळ आहे. शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे, ग्रामस्थांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणे व गावपातळीवरून शासनास महसूलप्राप्ती करून देणे हे महत्वपूर्ण काम तलाठ्याकडे असते. परंतु सद्यस्थितीमध्ये तलाठी कर्मचारी यांची संख्या अपुरी आहे. शासनाने ही रिक्त पदे न भरल्याने अतिरिक्त कामाचा बोजा त्यांच्यावर आहे. त्यामुळे नागरिकांनाही त्यांची कामे करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे आता तलाठी वर्ग कामात व्यस्त तर ग्रामस्थ त्रस्थ अशी अवस्था झाली आहे.

महसुली गावे 1602, कार्यरत तलाठी 483

जिल्ह्यामध्ये सुमारे 1602 महसुली गावे आहेत. पण त्या तुलनेत अवघे 586 तलाठीपदे मंजुर आहेत. त्यातील 103 पदे रिक्त आहेत. एका तलाठी कर्मचार्‍याकडे अगोदरच साधारणतः 4 ते 5 गावे असतात. परंतु या रिक्त पदांची जबाबदारीही आता यांच्यावर पडली असल्याने एका गावास दोन आठवड्यातून 1 दिवस तलाठी उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे कामकाजाचे संगणकीकरण चालू असल्याने बराचसा वेळ त्यासाठी द्यावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थांना तलाठी कार्यालयात असणारे काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तातडीची असणारी कामे करण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच तलाठी कर्मचार्‍यांवरही अतिरिक्त कामकाजाचा बोजा पडत आहे. त्यामुळे शासनाने या पदांवर लवकरात लवकर नवीन तलाठ्यांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांकडून तसेच तलाठी वर्गाकडूनही होत आहे. अपुर्‍या तलाठी कर्मचार्‍यांचा परिणाम गावपातळीवरून महसूल प्राप्ती होण्यावरही होत आहे.

तलाठी भरती प्रक्रिया रखडली

तलाठी हा महसूल व्यवस्थेचा महत्वाचा व प्रमुख घटक आहे. गावपातळीवरील संपूर्ण नियोजन तसेच कार्यालयीन सर्व कामकाज तलाठ्यांवर अवलंबून असते. महसूल गोळा करण्यातही तलाठी वर्गाचा सिंहाचा वाटा आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये तलाठी संख्या कमी आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामकाजाचा ताण पडत आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणच्या कामांना ते न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे शासनाने 100% तलाठी पदभरती करण्याची गरज आहे. शासनाने 4 महिन्यांपूर्वी तलाठी भरतीसाठी परीक्षा घेतलेली आहे. मात्र त्या परीक्षेतून अद्यापही अंतिम निवड यादी जाहीर केलेली नाही. गेल्या 4 महिन्यांपासून ही भरती प्रक्रिया रखडलेली आहे.

रिक्त जागा तात्काळ भरण्याची तलाठी संघटनेची मागणी

सद्यस्थितीमध्ये तलाठी संख्या कमी आहे. तसेच ऑनलाईन कामे, इतर शासकीय कामे यांचाही अतिरिक्त ताण पडत आहे. तसेच ही कामकाज करताना नेटवर्क समस्या, लाईट समस्या येत असतात. यातच अतिरिक्त गावांचा कामकाजाचा बोजाही तलाठ्यांवर पडत आहे. त्यामुळे संपूर्ण न्याय ते एका गावासाठी देऊ शकत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांचा रोष वाढत आहे. आणि या रोषाला बळी तलाठी वर्ग पडत आहे. त्यामुळे संघटनेच्या माध्यमामधून शासनाकडे आम्ही तलाठी पदभरती करावी अशी मागणी केली आहे. असे तलाठी संघटनेकडून सांगण्यात आले.