‘श्रीरामकृष्ण एज्युकेशन’च्या सूरज शिंदे याचा भारतीय खेळ पुरस्काराने सन्मान

अहमदनगर- श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनच्या शेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडियम स्कूल आणि मोहनलाल रामअवतार मानधना आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उज्वल यश संपादीत करून शाळेचा नावलौकिक वाढवत आहेत. शाळेतील इयत्ता 9 वीतील विद्यार्थी सूरज आबासाहेब शिंदे याला कराटे क्रीडा प्रकारातील नैपुण्यासाठी नवी दिल्ली येथे भारतीय खेळ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

दिल्ली येथे भारतीय ऑलम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष कुलदीप व्हॉटस, भारत गौरव, संदेश यादव, भारतीय खेळ पुरस्कार समितीचे सीईओ सुशीलकुमार यांच्या हस्ते शिंदे याचा गौरव करण्यात आला. भारत सरकारचे प्रमाणपत्र व पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील यशामागे संस्थाचालकांचे प्रोत्साहन व शिक्षकांचे परिश्रम याचा सिंहाचा वाटा आहे. आधुनिक युगातील तरूण पिढीला मैदानी खेळांकडे वळवताना त्यांच्यातील क्रीडा गुण हेरुन चालना देण्याचे काम शाळेत आवर्जून केले जाते. शाळेत सर्व प्रकारच्या मैदानी खेळांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकही खेळाडू घडविण्यात योगदान देत असतात. सूरज शिंदे याला लहापणापासूनच कराटेची आवड आहे. शाळेतील क्रीडा शिक्षक अजित लोळगे व दीपक धनवटे यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे तो अनेक स्पर्धा गाजवत आहे.

या यशाबद्दल सूरजचे संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष नंदकुमार झंवर व मोहनलाल मानधना, सेक्रेटरी डॉ.शरद कोलते, सहसेक्रेटरी राजेश झंवर, सदस्य बजरंग दरक, प्राचार्या राधिका जेऊरकर, समन्वयक सावित्री पुजारी, अंजना पंडीत यांनी अभिनंदन केले आहे.