सिंहाचा दरबार

एकदा वनराज सिंहाला वाटले म्हणून त्याने अरण्यातील सर्व प्रजाजनांना आपल्या दरबारात हजर राहण्याची आज्ञा सोडली. म्हणून अरण्यातील सर्व प्रजाजनांनी दरबारात हजेरी लावली.

तेव्हा सिंह महाराजांच्या स्वयंपाकगृहातून येणारा वास अस्वलाच्या नाकाला फारच झोंबला; म्हणून त्याने आपले नाक दाबून धरले.

अस्वलाचा हा उद्धटपणा सिंह महाराजांना सहन झाला नाही. रागावून त्याने आपल्या पंजाच्या एकाच फटकार्‍यात अस्वलाला ठार केले. या भयंकर प्रकाराने माकड भ्याले आणि थरथर कापू लागले.

आपली भीती लपवण्यासाठी काही तरी बोलायचे म्हणून माकड सिंहाला म्हणाले, ‘‘महाराजांच्या स्वयंपाकघरातून येणारा सुगंध किती सुंदर आहे! निरनिराळे मसाले वापरून उंची भोजन बनत आहे. हे त्या मूर्ख अस्वलाला समजले नाही आणि सहनही झाले नाही.

महाराजांचे पंजे तर किती सुंदर आहेत. त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही.’’ माकडाच्या या उपरोधिक बोलण्याने सिंहाला आनंद होण्याऐवजी तो जास्तीच खवळला; आणि क्षणभरातच त्याने माकडाला जमिनीवर आपटून ठार मारले.

नंतर सिंहाची नजर कोल्ह्यावर पडताच तो म्हणाला, ‘‘काय कोल्होबा, स्वयंपाकघरातून कशाचा वास येतो, ते तुम्ही सांगता काय?’’

यावर धूर्तपणाने कोल्हा म्हणाला, ‘‘राजाधिराज, माझे नाक इतके तीक्ष्ण नाही. नुसत्या वासावरून तो कशाचा आहे, हे मला सांगता येणार नाही. शिवाय आज चार दिवस झाले, मला सर्दी-पडसे झाले आहे. म्हणून आपल्या स्वयंपाकघरातून कशाचा वास येत आहे हे सांगण्याचे धारिष्ट्य मी करणार नाही.’’

तात्पर्य – हजरजबाबीपणा, समयसूचकता आणि प्रसंगावधान या गुणांच्या जोरावर माणूस एखाद्या कठीण प्रसंगीतून आपली सुटका करू शकतो.