नक्षा उतरला

बिरबलाची राहणी एकदम साधी असे. फक्त दरबारात जाताना तो उंची कपडे वापरत असे. असेच एकदा तो साधे कपडे घालून आपल्या घराच्या फाटकातून बाहेर पडून रस्त्याला लागला असता त्याला एक इसम भेटला व त्याने बिरबलाला विचारले, “काय रे, तुला बिरबलजींचे घर माहित आहे का?” तेव्हा बिरबलाने घराकडे बोट दाखविले व तो तेथून निघून गेला. तो इसम बिरबलाच्या घरी गेला असता तेथील सेवकाने ते इतक्यात बाहेर गेले आहेत; परंतु लवकरच परत येणार आहेत, असे सांगून एका बैठकीवर बसण्यास सांगितले.

अगदी थोड्याच अवधीत बिरबल पुन्हा घरी आला आणि आपल्याला मघाशी रस्त्यात भेटलेला माणूस म्हणजेच बिरबलजी आहेत, हे समजताच तो इसम फारच ओशाळला व बिरबलाला म्हणाला, ‘बिरबलजी, थोड्या वेळापूर्वी आपण मला रस्त्यात भेटलात, तेव्हा मी बिरबलजी कोठे राहतात, असा प्रश्न विचारला असता, आपणच बिरबल असल्याचे तेव्हा का बरे सांगितले नाहीत?”

यावर बिरबल म्हणाला, “तुम्ही मला रस्त्यात भेटलात, तेव्हा मला अरे-तुरे असे संबोधू लागलात. तेव्हा मला वाटले, आपण कोणीतरी बडी आसामी आहात. आणि मग मी तर तुमच्यापुढे अगदीच मामुली! म्हणून बड्या आसामीने विचारलेल्या प्रश्नाला अगदी मोजकेच उत्तर द्यायला नको का? त्याकरिता मी आपल्या प्रश्नाप्रमाणे उत्तर दिले.”

बिरबलने असा ठेवणीतला टोला हाणल्याने `त्या गर्विष्ठ माणसाचा नक्षा उतरला व त्याने बिरबलाची माफी मागितली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा