मेणबत्तीची फजिती

एका श्रीमंताकडे रात्रीच्या मेजवानीसाठी अनेक निमंत्रित पाहुणे येत होते. दिवाणखाना चांगला सजवला होता. तेथेच नोकराने एक शमादान आणून ठेवले. त्यातील मेणबत्तीचा प्रकाश सगळीकडे पडून तेथे मोठी शोभा निर्माण झाली होती.

ते पाहून मेणबत्ती स्वतःला फार मोठी समजू लागली. येईल त्याला म्हणू लागली, ‘‘पाहिलत का, माझ्या प्रकाशाने सारा दिवाणखाना कसा उजळून निघाला ते.

हवा कशाला तो सूर्य नि चंद्र. त्यांच्यापेक्षा माझाच प्रकाश किती मोठा आहे, हे तर तुम्हाला दिसतच असेल नाही? मेणबत्ती गर्वाने अशी बोलते आहे, तोच खिड़की उघडल्याने त्यातून वार्‍याचा झोत एकदम आत येताच मेणबत्ती विझून गेली.

यजमानाने पुन्हा ती पेटवीत म्हटले, ‘‘अगं बये, आता तरी विझू नकोस. अशीच पेटती राहून समारंभाची शोभा वाढवशील, तर बरे. कुठे तो सूर्य, चंद्र आणि तू? तुझ्यासारखे ते मध्येच विझून जात नाहीत. अशा बढाया मारून का कोणी मोठे होते?

तात्पर्य – ज्याच्या सामर्थ्याशी आपली तुलना होऊ शकत नाही, त्याची बरोबरी करण्याच्या बाता मारणे शोभादायक नसते.