ठकास महाठक

एका गावात एक व्यापारी राहत होता. व्यापारात त्याने बरीच कमाई केली होती. एकदा त्याच्या मनात आले, खूप धन कमावले, आता चारीधाम यात्रा करुन आल्यास तेवढेच पुण्य पदरी पडेल.

असा विचार करुन आपल्याजवळ असलेल्या माणसाकडे सोन्याच्या मोहोरा असलेली घागर सांभाळण्यासाठी देत म्हणाला, ‘‘मित्रा, मी काही दिवस यात्रेला निघालो आहे. चोरांचे भय असल्याने माझी ही सोन्याच्या मोहरा असलेली घागर तुझ्याकडे ठेव. मी लवकर परत येईन, तेव्हा मला परत कर.’’

असे म्हणून तो यात्रेला गेला. काही दिवसांनी यात्रा करुन तो व्यापारी परत आपल्या गावी आला आणि मित्राकडे जाऊन आपली सोन्याच्या मोहोरा ठेवलेली घागर मागू लागला.

तेव्हा तो लबाड मित्र म्हणाला,‘‘ अरे काय सांगू मित्रा, ‘‘तू गेल्यापासून उंदरांनी मला नकोसे करुन सोडले बघ. त्या पलीकडच्या गावातील उंदरांनी येऊन तुझी सोन्याच्या मोहोरा असलेली घागर केव्हा खाऊन टाकली, याचा मला पत्तासुद्धा लागला नाही.’’

त्यावर व्यापारी म्हणाला,‘‘ मित्रा, असे जगावेगळे उंदीर आजपर्यंत मी कधी ऐकले वा पाहिले नव्हते. बरं, असू दे.’’ असे म्हणत तो आपल्या बिर्‍हाडी पोहोचला.

दुसर्‍या दिवशी त्याचा मित्र बोंब करत त्याच्या घरी येऊन म्हणाला, ‘‘ अरे मित्रा, मी पुरता बरबाद झालो रे. माझा एकुलता एक मुलगा कोणी तरी पळवून नेला रे. आता मी काय करु? असे म्हणत तो रडू लागला.

त्यावर व्यापारी मित्र म्हणाला, ‘‘ अरे असे म्हणतोस? मग बरोबर. अरे आज सकाळीच एक ससाणा एका पोराला उचलून नेताना मी पाहिला बघ. मला तर वाटते, तो तुझाच मुलगा असणार.’’

त्यावर मित्र म्हणाला, ‘‘ हे काय भलतेच, एवढासा ससाणा एवढ्या मोठ्या मुलाला उचलून नेणे कधी शक्य आहे काय?

त्यावर व्यापारी म्हणाला,‘‘ अरे भाऊ, ज्या गावचे उंदीर सोन्याच्या मोहोरा खातात, त्याच गावचा ससाणा मुलाला उचलून नेतो, यात आश्‍चर्य ते कुठले?

तेव्हा मित्र मनात काय समजायचे, ते समजला. तो घरी गेला व मोहोरा भरलेली घागर घेऊन व्यापारी मित्राकडे आला आणि ती त्याला परत करताच व्यापारी मित्रानेही त्याचा पळवून आणलेला मुलगा परत केला.

तात्पर्य – नाक दाबले की तोंड उघडते.