कर्माचे फळ

एका अरण्यात एक सिंह राहत होता. शिकार करण्यात तर तो तरबेज होताच. पण अरण्यात त्याचा असा दरारा आणि वचक होता की, त्याचे नाव काढताच इतर प्राणी भीतीने चळचळा कापत असत. त्याच्या नुसत्या आवाजानेच सर्व प्राणी आपापल्या घरात लपून बसत. असे दिवस चालले असताना सिंह महाराज हळूहळू म्हातारे झाले.

आता तर त्याला बसल्या जागेवरुन उठतासुद्धा येत नव्हते. तोंडातले सर्व दात पडले होते. नख्या झिजल्या होत्या. बरेच दिवस खायला न मिळाल्यामुळे तो अगदी मरायला टेकला होता.

सिंहाची ही अवस्था सर्व प्राण्यांना समजली. सिंह महाराज आता जगत नाहीत, हे ओळखताच ज्या प्राण्यांना त्याने त्रास दिला होता, ते सर्व एकएक करुन त्याचा सूड घ्यायला येऊ लागले.

प्रथम रेड्याने आणि बैलाने शिंगांनी त्याला जखमी केले. तरसाने त्याच्या पाठीचा लचका घेतला. कुत्रे त्याला चावू लागले. रानडुकराने आपले तीक्ष्ण सुळे त्याच्या पोटात खुपसले. कोल्ह्याने त्याची शेपटी करंडून घेतली. गाढवाने त्याच्या तोंडावर लाथा हाणल्या. सांबर त्याच्या अंगावर थुंकले.

हे सर्व पाहून मरायला टेकलेला सिंह मनात म्हणाला, ‘‘हाय रे दैवा, काय ही माझी दैना? या अरण्याचा राजा म्हणून माझा किती मान होता. शुरातला शूर प्राणीसुद्धा मला पाहून चळचळ कापत होता.

आणि आज? काय ही माझी गत. कोणी मला चावतो, कोणी शिंगे खुपसतो, माझ्यावर थुंकतो आणि ते हलके नीच गाढव मला लाथा मारते? देवा, यापेक्षा मरण आलेले मी सुखाने पत्करीन.

तात्पर्य – आपण इतरांवर अत्याचार करतो. पण जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते, तेव्हा अत्यंत हलके गरीबही सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत.