गाढवाचे सोंग

एक गाढव इकडे- तिकडे उड्या मारत धावू लागले. धावता-धावता ते रानात आले. तेथे पडलेले सिंहाचे कातडे दिसताच त्याला सिंहाचे सोंग घ्यायची लहर आली. सिंहाचे कातडे अंगावर पांघरून आपण खरे सिंह आहोत हे दाखविण्यासाठी ते रानातच उंडारू लागले.

त्याला बघून हा सिंहच आहे, असे समजून अनेक प्राणी दूर पळू लागले. याची गाढवाला फारच गंमत वाटली. थोडा धीर चेपताच त्याने रानात आपल्या वागण्याने एकच धमाल उडविली.

अशा प्रकारे तो अनेक प्राण्यांना भीती दाखवू लागला. एके दिवशी वाटेत त्याला कोल्हा दिसताच त्याच्या अंगावर धावून जात त्याने सिंहासारखी डरकाळी फोडण्यासाठी आपले तोंड उघडले. पण तो गाढवच असल्याने त्याच्या तोंडून सिंहाची डरकाळी बाहेर पडण्याऐवजी गाढवाचा आवाज बाहेर पडला.

ते ऐकताच कोल्हा धीटपणे त्याच्या समोर जात म्हणाला,‘‘ गाढवमामा, आता पुरे करा हे नाटक. आपण थोडा वेळ जरी आपल्या जिभेवर ताबा ठेवला असता, तर मीही तुम्हाला सिंह समजून येथून पळ काढला असता. पण तुम्ही जीभ सैल सोडताच तुमच्या आवाजावरून तुम्ही कोण, ते मला बरोबर समजले. आता शहाणे व्हा आणि गुमान जा गावात. न पेक्षा खर्‍या सिंहाच्या तावडीत सापडून जीव गमावून बसाल.’’

तात्पर्य – घेतलेल्या सोंगाला, नकलेला सर्वजण फसत नाहीत. चतुर लोक खरेखोटे चटकन ओळखतात.