कृतघ्न माणूस

एका कुत्र्याने एका माणसाकडे बरीच वर्षे इमाने-इतबारे नोकरी केली. तरूणपणात अनेक प्राण्यांची शिकार करून त्याने मालकाची मर्जी संपादन केली. मालक त्याचे फार लाड करी. त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवी. चांगले-चुंगले खायला देई. असे बरेच दिवस चालल्यावर पुढे तो कुत्रा म्हातारा झाला. त्याचे दात पडले. पूर्वीसारखी त्याला शिकार पकडता येत नसे.

एके दिवशी मालकाबरोबर तोही शिकार धरायला रानात गेला. इतरही काही कुत्री बरोबर होती. एके ठिकाणी ससा धावताना दिसला. तशी सर्व कुत्री सशाच्या पाठी लागली, पण कोणालाही सशापर्यंत पोहोचता आले नाही. तेवढ्यात त्या म्हातार्‍या कुत्र्याने मुसंडी मारीत सर्वांच्या पुढे धाव घेतली आणि ससा धरला, पण तोंडात दात नसल्याने त्याला सशावर पकड घेता आली नाही.

हात पाय झाडून ससा त्याच्या तोंडातून निसटून दूर पळाला. असे पाहताच मालकाचा रागाचा पारा चढला. काठी घेऊन त्याने कुत्र्यालाच मारायला सुरूवात केली. काठीचा मार बसताच म्हातारा कुत्रा कळवळून म्हणाला, ‘‘अरे दुष्टा, किती तुझा कृतघ्नपणा!

आजवर मी कित्येक प्राणी धरून तुला दिले. तुझी इतकी वर्षे इमाने इतबारे सेवा चाकरी केली. त्याचा क्षणभर तरी विचार कर. आता मी म्हातारा झालो. तोंडात दात राहिले नाहीत, म्हणून मला शिकारीवर चांगली पकड घेता येत नाही. हा काही माझा दोष नाही. मी पूर्वी केलेली तुझी सेवा आठवशील, तर तुला माझी दया येईल.’’

तात्पर्य – एखाद्याने केलेले उपकार कधी विसरु नयेत.