मोर आणि इतर पक्षी

रानात एकदा पक्ष्यांची सभा भरली. अनेक पक्षी सभेला हजर होते. सर्वांना वाटले, आपल्याला एक राजा असावा. कोणाला राजा करावे, याबद्दल चर्चा सुरू झाली. मोराचे सौंंदर्य डोळ्यात भरले. त्यालाच राजा करावे, असे ठरले. मोरानेही पिसारा फुलवून याला मान्यता दिली.

इतक्यात कावळा उभा राहत म्हणाला, ‘‘मोर महाराज, क्षमा करा. पण माझ्या एका प्रश्‍नाचे उत्तर द्याल काय?’’

यावर मोर म्हणाला, ‘‘बोल मित्रा, तुझ्या मनात ज्या शंका, कुशंका असतील त्या सांगून मोकळा हो. आमच्याकडून तुला अभय आहे.’’

तेव्हा कावळा म्हणाला, ‘‘महाराज, आता राजा झाल्यावर आमच्या सर्वांच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. पण समजा, आपला मूळचा स्वभाव उफाळून येऊन घार, गरूड यांनी आम्हासारख्या गरिबांवर हल्ला केला, तर आपण कशाने आमचे रक्षण कराल? हे जर तुम्ही आम्हाला सांगितले, तर आम्हाला तुमच्या भरोशावर निश्‍चिंत राहता येईल. इतकीच माझी नम्रतेची मागणी आहे.’’

कावळ्याचा बिनतोड सवाल ऐकताच सर्वांना मोराचा कमकुवतपणा लक्षात आला. एका सौंदर्याशिवाय मोराजवळ लढण्याचे कोणतेही साधन नव्हते. सर्वांना आपली चूक कळून आली.

मग सगळे पक्षी एका सुरात म्हणाले, ‘‘या नाजूक आणि सुंदर असलेल्या मोराकडून आमचे कसलेही संरक्षण होणार नाही. एखाद्या बलवान आणि सामर्थ्यवान पक्ष्याला आपला राजा केले, तरच आपले संरक्षण होईल, यावर सर्वांचे एकमत झाले.’’

तात्पर्य – सौंदर्य, श्रीमंती यापेक्षा चातुर्य, युक्ती आणि बल याची योग्यता अधिक असते.