कोल्हा वळणावर गेला

एका अरण्यात एक कोल्हा आणि लांडगा राहत असता त्यांची चांगली मैत्री जमली. एकमेकांची वाटेत भेट झाली असता ते परस्परांना नमस्कार करून विचारपूस करीत व थोडा वेळ गप्पा मारून ते आपला रस्ता धरीत.

एकदा असाच लांडगा वाटेत भेटला असता कोल्हा उदासपणे त्याला म्हणाला, ‘‘काय लांडगेदादा, कसा काय, बरा आहेस ना? तसा तू बराच असणार. तुला नेहमीच चांगली शिकार मिळते. त्यावर पोटभर ताव मारीत तू आरामात जगतोस. पण माझ्या वाट्याला हे सुख नाही. दिवसभर हिंड-हिंड हिंडूनही मला कधी शिकार सापडत नाही. कधी-कधी तर उपाशीपोटीच दिवस ढकलावा लागतो. लपत-लपत शिकार शोधीत असता जिवाचीही भीती असते. जिवाला मी अगदी कंटाळलो बुवा. तुला असा त्रास नाही. कुरणात शिकार करून तू मजा मारतोस. तेव्हा तुझे शिकारीचे डावपेच मला शिकव. तुझ्या हाताखाली शिकून स्वतः मेंढी मारून खाणारा पहिला कोल्हा आमच्या कुटुंबात मीच असेन.’’

अशा प्रकारे कोल्हा लांडग्याची विनवणी करू लागला. अखेर लांडग्याने त्याला होकार दिला. लांडगा त्याला शिकारीचे डावपेच शिकवू लागला. प्रथम त्याने कोल्ह्याला एका मरून पडलेल्या लांडग्याचे कातडे पांघरायला दिले. त्यामुळे कोल्हा लांडगा दिसू लागला. मग चावणे, गुरगुरणे, मेंढ्याच्या कळपावर कसा हल्ला करावा, याचे धडे कोल्हा गिरवू लागला.

सुरुवातीला कोल्ह्याला हे धडे शिकणे जरा जड गेले, पण थोड्याच दिवसांत त्याने शिकारीची विद्या आत्मसात केली. ते पाहून लांडगासुद्धा आश्चर्यचकित झाला. अशा प्रकारे तरबेज झालेला कोल्हा मेंढ्यांचा एक कळप दिसताच बेधडक कळपात घुसला. हल्ला करून त्याने एक मेंढी तोंडात धरून आणली आणि आता तो तिला फाडून खाणार, तोच पलीकडे जंगली कोंबड्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. आपल्या ओळखीचा आवाज येताच कोल्हा लांडग्याचे घेतलेले रूप विसरला, तोंडात पकडलेली मेंढी सोडली आणि तो कोंबड्याला धरण्यास धावला. ते पाहून लांडग्याने कपाळावर हात मारून घेतला.

तात्पर्य – माणसाला मूळ स्वभाव उफाळून असा वर येतो.